परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील श्री दत्तप्रभू अनुदानित आश्रमशाळेत शिकणाºया एका विद्यार्थ्याचा शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेने अनुदानित आश्रमशाळांतील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिशुपाल सुनील बेलसरे (१३, रा. चौºयामल) असे मृताचे नाव आहे.
धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथील दत्तप्रभू माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिशुपाल हा शिक्षण घेत होता. तीन-चार दिवसांपासून पोटदुखीचा त्रास झाल्याने त्याला धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. थोडे बरे वाटल्यावर त्याला सुट्टी देण्यात आली. परत त्याच दिवशी सायंकाळी त्रास वाढल्याने त्याला धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाच्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने आश्रमशाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. उपचारापूर्वीच शिशुपालची प्राणज्योत मालविल्याचे वैद्यकीय अधिकारी अशोक जुमळे यांनी सांगितले. नेत्यांच्या शाळांमध्ये बेजबाबदारीचा कळसमाजी राज्यमंत्री वसुधा देशमुख अध्यक्ष असलेल्या पीपल्स वेलफेअर सोसायटी अंतर्गत पिंपळखुटा येथील श्री दत्तप्रभू आश्रमशाळा चालविली जाते. मात्र, आश्रमशाळा संहितेनुसार येथे व्यवस्था नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मेळघाटसह इतर नेत्यांच्या आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा ठरत आहेत.
सदर प्रकरण वाढू नये, यासाठी दिवसभर राजकीय स्तरावर हालचाली सुरू होत्या. यादरम्यान शिशुपाल बेलसरे या विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी आणि संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी आदिवासी पालकांनी केली आहे. त्रिसदस्यीय समिती करणार चौकशीआदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास प्रथम चौकशीची जबाबदारी प्रकल्प अधिकारी, तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकाºयांची असते. त्यानुसार ही त्रिसदस्यीय समिती शिशुपाल बेलसरेच्या मृत्यूची कारणमीमांसा करणार आहे.
पिंपळखुटा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची त्रिसदस्यीय समिती तात्काळ चौकशी करेन. त्यानंतरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- सुशीलकुमार खिल्लारे, प्रभारी प्रकल्प अधिकारी, धारणी