आॅनलाईन लोकमतअमरावती : एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने शाळेत न जाता दोन वयस्क मित्रांसोबत जंगल गाठले. हे गुपित उघड होऊ नये, यासाठी अपहरणाचा बनाव केला. यामुळे सोमवारी गाडगेनगर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सहा तासांच्या पाठपुराव्यानंतर रहस्य उलगडले आणि पोलिसांसह मुलाच्या आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.कांतानगर स्थित आयटीआय कॉलनीतील १४ वर्षीय मुलगा शाळेत जाण्यासाठी सोमवारी घराबाहेर पडला. तो शाळेतून परतला नाही म्हणून मुलाची आईने शोधाशोध केली. त्याच्या मोबाइलवर कॉल केले. त्याने कॉलला प्रथम प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मी जगंलात आहे, येथे कसा आलो हे माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे आईने तत्काळ शेजारच्यांना घेऊन गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. मुलाला गुंगीचे औषधी देऊन शाळेतून अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. मात्र, काही पत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी मोबाइल क्रमांकावरून लोकेशन घेतले आणि शिवटेकडीवरून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मित्रांचा शोध घेऊन त्यांचे बयाण नोंदविले. त्यांनीही पोलिसांना घटनाक्रम कथन केला. त्यांना ताकीद देऊन पोलिसांनी सोडले.
आईला मुलाचा उमाळागाडगेनगर पोलिसांनी आई-वडिलांना मंगळवारी ठाण्यात बोलाविले. यावेळी मुलाचे अपहरणच झाले होते, असे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची तयारी त्या मुलाच्या आई दाखविली. माझा मुलगा हुशार आहे, असे तिचे म्हणणे होते. तो मुलगासुद्धा शेवटपर्यंत खोटाच बोलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
असा रचला प्लॅन१४ वर्षीय मुलाने शाळेत जाण्याऐवजी त्याच्या वयापेक्षा मोठे असणाºया दोन मित्रांसोबत फिरण्याचा प्लॅन बनविला. रीतेश बोबडे (१९) याच्या रेसर बाइकने फिरण्याचा त्याचा प्लॅन होता. यामध्ये त्यांनी नीलेश मोहिते (२२, रा. कांतानगर) यालाही सहभागी करून घेतले. बाइकने शहरातील प्रशांत नगर गार्डन व अन्य ठिकाणी फिरून त्यांनी महादेव खोरीजवळील जंगल गाठले. त्याठिकाणी बाइकसह फोटोसेशन केले. त्यानंतर तिघेही शिवटेकडीवर आले. दरम्यान, मुलाला आई-वडिलांचे फोन येऊ लागले. मात्र, त्याने उचलले नाही. त्यामुळे रीतेशशी संपर्क साधला. त्यानेही तुमचा मुलगा माझ्यासोबत नाही, असे उत्तर दिले. दरम्यान, पोलिसांचेही फोन येत असल्याचे पाहून नीलेश व रीतेश घाबरले. सायंकाळी ४ वाजता पोलिसांनी या मुलाचे लोकेशन घेऊन त्याला शिवटेकडीवरून ताब्यात घेतले.त्या मुलाला शाळेत जायचे नव्हते. म्हणून तो मित्रासोबत जंगलात फिरायला गेला. मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध घेतला. मात्र, तरीसुद्धा तो खोटाच बोलत होता आणि त्याची आईसुद्धा त्याच्याकडून भाग घेत होती.- मनीष ठाकरे,पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.