गंभीर जखमी : रिद्धपूर गोविंदप्रभू आश्रमशाळेतील घटनाचांदूरबाजार : नजीकच्या रिद्धपूर येथील गोविंदप्रभू गुरूकुल आश्रमशाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी भावेश संतोष माकोडे (९) हा आश्रमशाळेच्या वरच्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना दिनांक २४ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता आश्रमशाळेच्या आत घडली. या निवासी आश्रमशाळेत १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत खालच्या मजल्यावर विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे तर वरच्या मजल्यावर शैक्षणिक वर्ग भरतात. शाळा सुरू असताना भावेश हा पहिल्या मजल्यावरील अडीच फुटांच्या भिंतीवरून खाली वसतिगृहाच्या अंगणातील फरशीवर पडला. समोरील सज्जाला धडकून खाली पडल्याने त्याच्या कंबरेला जबरदस्त दुखापत झाली. तो सज्जाला धडकला नसता तर वसतिगृहातील फरशीवर पडून त्याला जीवही गमवावा लागला असता. घटनेनंतर लगेच मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांनी भावेशला चांदूरबाजारच्या ग्रामीण रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी भावेशच्या कमरेचे हाड मोडल्याचे निदान केले. लगेच त्याला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांनी अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिल्याने शिक्षकांनी भावेशला इर्विनमध्ये दाखल केले. भावेशची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मुख्याध्यापक कोहळे यांनी लोकमतला दिली. १५ फुटांवरून कोसळल्याने भावेशला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)
आश्रमशाळेच्या पहिल्या मजल्यावरून विद्यार्थी कोसळला
By admin | Published: August 26, 2016 12:15 AM