बडनेरा (अमरावती) : नवीन युनिफॉर्म का घेतला नाही. या कारणास्तव इग्नायटेड माईड्स स्कूल प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना मंगळवारी शाळेच्या बाहेर काढल्याने पालकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. चार हजारांचा युनिफॉर्म असतो का, असा जाब संस्था चालकास विचारण्यासाठी मोठ्या संख्येत पालक एकवटले होते. मुलांना शाळेच्या बाहेर का काढले. या कारणावरून पालक तसेच शाळा प्रशासनात चांगलीच जुंपली होती.
यवतमाळ मार्गावरील व्यंकटेश बालाजी नगरात इग्नायटेड माईड्स स्कूल ऑफ इंटेलेक्चुअल नावाने नर्सरी ते बारावीपर्यत शाळा आहे. या शाळेने यावर्षी नवीन युनिफॉर्म घेण्याच्या सूचना पालकांना दिल्या होत्या. या युनिफॉर्मची किंमत अडीच हजारांपासून चार हजारांपर्यंत वर्गानुसार ठरवून देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म घेतला नाही. अशांना शाळा प्रशासनाने शाळेच्या बाहेर काढल्याने पालकांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. शाळा प्रशासनाच्या या संतापजनक प्रकारावर तीव्र रोष व्यक्त केला. संस्थाचालकास शाळेत बोलावण्यात आले. सर्वसामान्य, गोरगरीब पालकांनी ४ हजारांचा युनिफॉर्म कसा घ्यायचा, असा जाब संस्था चालकास विचारण्यात आला. यावेळी पालकांनी संताप व्यक्त केला.
शाळेला ग्राऊंड नाही. शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी धड रस्ता नसून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे आहेत. आमच्या पाल्याचा जीव टांगणीला असल्यासमान शाळेची अवस्था आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. येत्या आठ दिवसात सर्व काही मार्गी लावू, असे आश्वासन संस्था चालकाने दिल्यानंतर पालकांचा रोष शांत झाला. अजय जैस्वाल, किशोर जाधव, बंडू धामणे आदी सामाजिक कार्यकर्ते पालकांच्या वतीने शाळेत आले होते. या सर्वानी संस्था चालकास धारेवर धरले होते.
- तीन ते चार हजार रुपयांचा युनिफॉर्म विकत घेणे आमच्यासारख्या सर्वसामान्य पालकांना न झेपणारे आहे. शाळा प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करावा. शाळेत अनेक गैरसोयी आहेत. आधी त्याकडे लक्ष द्यावे.
जय गुप्ता, पालक
- माझी दोन मुले या शाळेत आहेत. युनिफॉर्मचे एवढे पैसे आणायचे कुठून, कोरोनामुळे आधीच सर्वांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. शाळांनी यावर्षी नवीन युनिफॉर्म द्यायलाच नको होता.
सचिन बारस्कर, पालक
- पालकांच्या समस्या नक्कीच ऐकून घेतल्या जातील. येणाऱ्या आठ दिवसांमध्ये त्यावर शाळा प्रशासनाकडून सामोपचाराने योग्य तो मार्ग काढला जाईल. सर्वांनी सहकार्य करावे.
प्रवीण बारंगे, संस्थाचालक