जितेंद्र फुटाणे
हिवरखेड (अमरावती) : देशभरातील हजारो विद्यार्थी जे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांनी शिक्षणाचे अंतिम वर्ष पूर्ण केले. परंतु कोरोनामुळे विमान सेवा बंद असल्याने या सर्वांना त्या-त्या देशात इंटर्नशिपसाठी जाण्यावर मर्यादा आल्या आहेत.
इंटर्नशिपसाठी जाता येत नसल्याने त्यांना अंतिम पदवी मिळवण्यात अडचणी येणार आहे. याबाबत आता केंद्र शासनाच्या आरोग्य विभागानेच मार्ग काढण्याची गरज आहे. कोल्हापूर आणि ( हिवरखेड) अमरावती येथील दोन विद्यार्थ्यांनी हा मुद्दा खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे मांडला आहे.
कोल्हापुरातील ऋतुराज राजेंद्र देसाई आणि हिवरखेड येथील (अमरावती) प्रितेश मनोहर पाटील हे दोघेही फिलिपाईन्समधील मनीला येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. महाराष्ट्रातील असे १०० हून अधिक विद्यार्थी या देशात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या दोंघाचेही अंतिम वर्ष झाले असून त्यांना जून २०२१ मध्ये इंटर्नशिपसाठी परत जायचे होते. परंतु कोरोनामुळे विमानसेवा बंद आहे. त्यांना तिकडे जाता येत नाही. त्यामुळे या दोघांनी फिलिपाईन्स मेडिकल कौन्सिलशी संपर्क साधला असता, त्यांनी तुम्ही तुमच्या राज्यातच इंटर्नशिपसाठी करा, अशा सूचना दिल्या. या दोघांसह अन्य विद्यार्थ्यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद आणि महाराष्ट्र विद्यापीठाशीही संपर्क साधला. परंतु परदेशातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना महाराष्ट्रात इंटर्नशिप देण्याबाबत केंद्र शासनच निर्णय घेऊ शकते, अशी भूमिका या दोन्ही संस्थांनी घेतली आहे. आपापल्या राज्यात इंटर्नशिप पूर्ण केल्यास संबंधित आरोग्य संस्थेकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन ती ग्राह्य धरण्याची खात्री दिली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे.
विद्यार्थी प्रतीक्षेत
प्रत्येक राज्यातील हजारो विद्यार्थी ते परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यांना कोरोनामुळे ही अडचण आली असून, यासाठी धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, अशी मागणी होत आहे.
कोट
दोन विद्यार्थी मला भेटले. त्यांचा प्रश्न केंद्रीय पातळीवरच सुटणार असल्याने त्यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेतली. त्यांनी चांगल्या पद्धतीने हा प्रश्न समजून घेतला. यावर लवकर निर्णय होईल, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे.
- धैर्यशील माने, खासदार