अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्राथमिक विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय तीन दिवसीय क्रीडा महोत्सव होत आहे. या क्रीडा महोत्सवातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना छोटा हत्ती म्हणवल्या जाणाऱ्या छोटेखानी मालवाहतुकीच्या वाहनातून नेले जात आहे. बुधवारी दुपारी आयोजनस्थळाच्या पुढेच हा प्रकार निदर्शनास आला. विशेष म्हणजे, यात पूर्वीच कपाट व इतर साहित्य होते. त्यात विद्यार्थिनींना अक्षरश: कोंबले गेले.
दोन वर्षांनंतर प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा मुख्यालयी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये १४ पंचायत समित्यांमधील विविध शाळांमधील सुमारे १ हजार ७३६ शालेय विद्यार्थी तसेच ३४२ क्रीडा प्रभारी सहभागी झाले आहेत. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शाळांनी खासगी वाहनांचा उपयोग करण्यात आला आहे. मात्र, त्यात विद्यार्थ्यांना जनावरांसारखे कोंबून नेले जात असल्याची बाब १ फेब्रुवारी रोजी निदर्शनास आली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न व शिक्षक तसेच एकंदर प्रशासनाचे दुर्लक्ष या बाबी ऐरणीवर आल्या आहेत.
संपर्क साधताच मंचावरून सूचना
गावाकडे परतणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक कोंबून होत असल्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘लोकमत’ने त्यांची बाजू जाणून घेतली. यानंतर लगेच विभागीय क्रीडा संकुलातील स्पर्धा आयोजकांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीच्या सूचना दिल्या.
क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक
तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात सहभागी १४ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शाळांकडून ज्या खासगी वाहनांद्वारे ने-आण केली जात आहे, त्यात काच लावल्यानंतरची स्थिती विदारक आहे. त्या बंद वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेले जात आहेत.
क्रीडा स्पर्धेत सहभागी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक ही सुरक्षित व्हावी, अशा स्पष्ट सूचना बीईओंमार्फत संबंधित शाळेच्या शिक्षकांना दिल्या आहेत. मात्र, असे असतानाही ज्या शाळांनी मिनीट्रक व अन्य मालवाहतुकीच्या वाहनात शालेय विद्यार्थ्याची ने-आण केल्याचे आढळले, अशा शाळांच्या संबंधित शिक्षकांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाईल.
- नितीन उंडे, क्रीडा संयोजक, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद