लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्कृष्ट शालेय इमारती, वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा, परिसराचे सौंदर्यीकरण, सभागृहे, विश्रामगृहे, ग्रामपंचायत इमारती आदींची निर्मिती करताना जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिली. विविध योजनेंतर्गत १७ कोटी ८५ लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते. मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे १ कोटी रुपये प्रमाणे प्राप्त निधीतून तळणी पिंपळखुटा रस्त्यावर दोन लहान पुलांच्या कामाचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त सुमारे ६० लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम व १० लक्ष रुपयांच्या निधीतून रस्त्याचे लोकार्पण, १० लक्ष रुपयांच्या निधीतून मुस्लिम कब्रस्तानचे बांधकाम व सौंदर्यीकरणचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच पल्लवी मानकर, उपसरपंच पद्मा डोळस आदी उपस्थित होते.मोर्शी तालुक्यातील शिरलस येथे दहा लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत भवनाचे व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नागरी सुविधा केंद्राचे लोकार्पण, आठ लक्ष रुपयांच्या निधीतून व्यायाम शाळेचे लोकार्पण, शाळा वर्गखोली दुरुस्तीचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. यावेळी सरपंच निपेश चौधरी, रमेश काळे आदी उपस्थित होते.