अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने फार्मसी, लॉ आणि इंजिनिअरिंगसहित सर्व शाखेतील द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करून पुढील वर्षात प्रवेश देण्यासाठी मंजुरी दिली आहे. या कॅरी ऑनसाठी मागील पंधरा दिवसांपासून युवा सेनेच्या वतीने आंदोलन सुरू होते. अखेर या आंदोलनाला यश आले असून विद्यापीठाने सर्व शाखेसाठी कॅरी ऑन लागू करण्यासंदर्भातील पत्र दिले आहे.
विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी फक्त निवडक शाखेसाठी कॅरी ऑन लागू करत इतर शाखेतील विद्यार्थ्यांना तात्काळत ठेवले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या या भेदभाव विरुद्ध युवा सेनेने एल्गार करत सरसकट सगळ्यांना कॅरी ऑन लागू करण्याची मागणी केली होती. युवासेना (उबाठा) चे विभागीय महासचिव सागर देशमुख व शहरप्रमुख योगेश सोळंके यांनी गेल्या २२ ऑगस्टपासून कॅरी ऑनसाठी विद्यापीठातील विद्यार्थी भवनावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु विद्यापीठ कधी विद्यापीठ अध्यादेश तर कधी शिखर संस्थांच्या परवानगीचे कारण देत आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न करत होते.
अखेर युवा सेनेची मागणी मात्र विद्यापीठाने मान्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे समोरचे एक वर्ष आता वाचणार आहे व पुढील एक वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विषयात उत्तीर्ण होण्याची अट विद्यापीठाने विद्यार्थ्यांसमोर ठेवली आहे. कॅरी ऑनचे परिपत्रक मिळताच विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांचा विद्यापीठामध्ये जयघोष केला यावेळी प्रवीण हरमकर, आशिष धर्माळे, युवा सेना विभागीय सचिव सागर देशमुख, स्वराज ठाकरे, राहुल माटोडे, योगेश सोळंके व विद्यार्थी उपस्थित होते.