अमरावती: तब्बल ४४ हजारांची रोकड व ५ ग्रॅमची सोन्याची पोत असलेली बॅग ऑटोचालकाने संबंधित महिलेच्या हवाली केली. या प्रामाणिकपणाचा गाडगेनगर पोलिसांकडून सन्मान करण्यात आला. शारदा श्रीकृष्ण शिंदे या ती बॅग ऑटोत विसरल्या होत्या.
शारदा शिंदे (रा. लहान उमरी अकोला) हे त्यांचे भाऊ प्रवीण (महाजनपुरा) यांचे ऑपरेशन करिता अमरावतीला आल्या होत्या. लाहोटी हॉस्पिटलमध्ये त्यांना एमआर रिपोर्ट काढायचा असल्याने त्या महाजनपुरा येथून रविवारी साधारणतः १२.३० च्या सुमारास ऑटोने कॅम्पस्थित लाहोटी हॉस्पिटल येथे उतरल्या. हॉस्पिटलमध्ये जात असताना त्यांच्या लक्षात आले की त्या ४४ हजार रुपयांची रोकड व २५ हजारांची पोत असा ऐवज ऑटोतच विसरल्या. त्यांनी बाहेर येऊन तो ऑटो शोधला. मात्र, न मिळाल्याने त्यांनी गाडगेनगर ठाणे गाठले.
पीएसआय सूरज कोल्हे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ऑटोबाबत माहिती दिली. पेट्रोलिंग टीम व बिट मार्शल घटनास्थळी पोहोचले. दरम्यान १.३० च्या सुमारास तेथे एक ऑटो आला. कोल्हे यांनी त्याला विचारपूस केली असता, तो तीच बॅग देण्यासाठी लाहोटी हॉस्पिटल परिसरात आल्याचे सांगितले. त्यांना गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पर्स उघडली असता, त्यातील संपुर्ण ऐवज जैसे थे होता. त्यामुळे मोहमद सलीम मोहमद शमी (रा. ताज नगर) या ऑटोचालकाचा पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात आला. ऑटोचालकाची प्रामाणिकता व पोलिसांच्या तत्परतेने आपल्याला रक्षाबंधनाची भेट मिळाल्याची प्रतिक्रिया शारदा शिंदे यांनी दिली.