अमरावती : अमरावती महानगराला पाणीपुरवठा होणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात शासन, प्रशासन ते सरकार असा तब्बल १०३ दिवसांपर्यंत पाठपुरावा केला. यादरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव, मायवाडी एमआयडीसीतून होणारा पाणीपुरवठा तोडण्याचे आंदोलन, रास्ता रोको, अप्पर वर्धा धरणावर हल्लाबोल, मोर्शी येथे जिल्हाधिकाऱ्यांना विश्रामगृहावर घेराव, साखळी उपोषण अशी नानाविध आंदोलने करून लक्ष वेधले. मात्र, मागण्या लालफीतशाहीत रुतल्याचे दिसून येताच मंगळवारी थेट मंत्रालयातच लक्षवेधी हल्लाबोल आंदोलन करून राज्य सरकारला लक्ष देण्यास भाग पाडले.
जमिनी दिल्यात, वाढीव मोबदला का नाही, असा सवाल उपस्थित करून ७५ वर्षीय ज्योतीराम बानेकर, विठ्ठलराव नागले, दिलीप पंडागळे, पंजाबराव ठाकरे, घनश्याम सोनार हे प्रकल्पग्रस्त प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलनस्थळी ठाम आहेत. १९ मे २०२३ पासून आंदोलन प्रारंभ झाले असून, ते आजतागायत कायम आहे.
- तर मंत्रालयासमोर विष घेऊ
निगरगट्ट शासनाने तोडगा काढला नाही, दखलही घेतली नाही. म्हणून नाइलाजाने मंगळवारी मुंबई मंत्रालयात मोर्शी-वरूड येथील प्रकल्पबाधित २५० ते ३०० शेतकरी बांधवांनी मिळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. किंबहुना शासनाने याबाबत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, समस्या सोडविल्या नाहीत, तर मंत्रालयासमोर विष घेऊन आत्महत्या करू, असा इशारासुद्धा शेतकऱ्यांनी दिला आहे.