प्रदीप भाकरे
अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्यातील ‘सुसाईड ईन कस्टडी’ने पोलीस यंत्रणेचे हार्टबिट वाढविले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून एकीकडे तपास सुरू असताना, राजापेठच्या सहायक पोलीस आयुक्तांनी देखील समांतर चौकशी आरंभली आहे. शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्यात ‘रूटिन वर्क’ सुरू असले, तरी आरोपीच्या कोठडीतील आत्महत्येचा धसका अनेकांच्या चेहर्यावर ठळकपणे जाणवला. या घटनेचा तपास ‘सुमोटो’ सीआयडीकडे गेला असताना, संभाव्य कारवाईची तलवार नेमकी कुणावर कोसळणार, अशी साशंक भीती अनेकांना सतावत आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सागर श्रीपत ठाकरे याला अटक करण्यात आली. १८ रोजी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. १८ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्याला राजापेठच्या लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते.
हवालातीच्या दाराच्या आर्कला बांधले शर्ट?
पोलीस सुत्रानुसार, राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीला एकमेव लोखंडी दार आहे. ते सुमारे १० ते १२ फुट उंचीचे असावे. दाराच्या अगदी वरच्या भागाला आरोपीने शर्ट बांधला. त्या शर्टची बाहीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी गुरूवारीच उघड केली होती. त्यावेळी हवालातीत अन्य एक आरोपी होता, तो त्यावेळी निद्राधिन होता. तसा जबाब त्याने दिला आहे.
ठाणेदारांचे कॅबिनमध्ये सीसीटीव्ही स्क्रिन
राजापेठ पोलीस ठाण्यात एकूण १६ सिसीटिव्ही कॅमेरा आहेत. ते ठाणेदारांच्या कक्षातील स्क्रिनला जोडण्यात आले. पैकी १४ कॅमेरे सुरू आहेत. हवालातमध्ये असलेल्या एका सिसिटिव्हीचा देखील त्यात समावेश आहे. पोलीस ठाणे, हवालातीपासून ठाण्यात कोणते वाहन, कोणता इसम प्रवेशला, हे ठाणेदार आपल्या कक्षातील स्क्रिनवर पाहू शकतात.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?आरोपी सागर ठाकरेविरूद्ध गुन्हे नोंदविले ते फ्रेजरपुरा पोलिसांनी, अटकही त्यांच्याच दप्तरी. मात्र केवळ लॉकअप नसल्याने त्याला राजापेठ लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्या लॉकअपमध्ये सागरने स्वत:ला संपविले. राजापेठ पोलिसांची प्रचंड धावाधाव झाली. राजापेठमधील डीओपासून, डायरी अंमलदार, गार्ड व ठाणेदारांना देखील सीआयडी चौकशीला देखील सामोरे जावे लागणार आहे.