मोर्शी (अमरावती) : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ५८ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २० डिसेंबर रोजी पिंपळखुटा मोठा येथे उघडकीस आली. अशोक एकनाथ अकोलकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यांच्याकडे मौजा वाठोडा (मुनाईनपूर) शिवारात चार एकर शेती आहे. त्यांनी शेतात पेरणीसाठी खासगी कर्ज घेऊन सोयाबीन, उडीद, मूग व कपाशीची पेरणी केली. मात्र, सुरुवातीला शेतात पेरणी झाल्यानंतर सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने ते उगवलेच नाही. शेती रिकामी राहू नये म्हणून त्यांनी कापसाची पेरणी केली. कपाशीवर बोंडअळी व बोंडसडीचा प्रादुर्भाव झाला. अवकाळी पावसामुळे तुरीचाही बहर गळून पडला. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे व पत्नीसह दोन मुलांचे व आई-वडिलांचे पालन-पोषण कसे करावे? या विवंचनेत ते राहत होते. १९ डिसेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांना उपजिल्हा रुग्णालय व पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अशोक अकोलकर यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले, पत्नी व आई-वडील असा आप्तपरिवार आहे.