तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील घटना
तिवसा /सूरज दाहाट
तालुक्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वऱ्हा या गावातील ५०वर्षीय बँडबाजा कलाकाराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी१ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. रमेश रघुनाथ इंगळे (५०, रा.वऱ्हा) असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलीस पोहेकार, राजेंद्र बेलसरे, रानबोले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला.
दीड वर्षापासून कोरोना महामारीने बँड कलाकारांचा व्यवसाय बंद असल्याने कलाकार आर्थिक अडचणीत सापडला होता. शासनाने कलाकारांना मदत करावी, याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर कलाकारांच्या विविध संघटनेने निवेदन देऊन मदतीची मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याने परिस्थिती पुढे हतबल झालेल्या तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील बँड कलाकार रमेश इंगळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ३० वर्षांपासून इंगळे हे लग्न समारंभात बँड वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यातच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
---