लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. आपल्या आत्महत्येस वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असा संदेश त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केला आहे. रामसिंह गुलाबसिंह चव्हाण (५४, रा. चपराशीपुरा) असे मृताचे नाव आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ३५ वर्षांपासून पोलीस सेवेत असलेले एएसआय रामसिंह चव्हाण यांच्या पश्चात पत्नी अनिता तसेच सागर व अमन ही दोन मुले आहेत. पत्नी अनिता महापालिकेत लिपिक आहेत. सागर हा पुणे व अमन हा अमरावतीतच शिक्षण घेत आहेत.गतवर्षी ड्युटीवर असताना रात्रीच्या वेळी रामसिंह चव्हाण यांना अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे ते बराच काळ कर्तव्यावर हजर राहू शकले नाहीत. या काळातील त्यांचे काही वेतन देणे शिल्लक होते. त्यांनी यासाठी पाठपुरावा केला. वेतन न मिळाल्याने ते पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला पैसे पाठवू शकले नाहीत. त्यामुळे मानसिक तणावग्रस्त स्थितीत ते होते. रविवार रात्री कर्तव्य बजावल्यावर साप्ताहिक सुटी असल्याने रामसिंह हे सोमवारी घरीच होते. पत्नी अनिता नोकरीवर व मुलगा अमन हा महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांनी बंद घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी २ वाजता अनिता यांनी त्यांना अनेकदा कॉल केला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकाला कॉल करून घरी जाण्यास सांगितले. घराची दारे बंद असल्याचे कळल्यावर त्या घरी परतल्या. त्यांनी खिडकीच्या काचा फोडून आत निरीक्षण केल्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली. रामसिंह चव्हाण यांना तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.रामसिंह १४०० दिवस अनुपस्थित पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरणरामसिंह चव्हाण हे १९९३ पासून आतापर्यंत एकूण १४०० दिवस कर्तव्यावर अनुपस्थित होते. २८ नोंव्हेंबर २०१८ ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ते ७९ दिवस आजारपणाच्या कारणास्तव अनुपस्थित होते. चव्हाण यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करताही केवळ फिटनेस प्रमाणपत्राच्या आधारे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना कर्तव्यावर रूजू करून घेण्यात आले. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ते कर्तव्यावर रूजू झाले. २०१८-१९ सालाचा ५० हजार ८९५ रुपये प्राप्तिकर फेब्रुवारी व मार्च महिन्यांच्या वेतनातून कपात करण्यात आला. त्यांच्या थकीत वेतनाचा, वैद्यकीय प्रमाणपत्राचा आणि वैद्यकीय रजांसंबंधीचा मुद्दा पूर्णत: प्रशासकीय बाब आहे. वर्षभरात रामसिंह यांना ५,६८,००० रुपये वेतनापोटी अदा करण्यात आलेत. त्याशिवाय २,३५,५६५ रुपये ही अॅरिअर्सची रक्कमही त्यांना देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिले आहे.घटनास्थळी पंचनामा केला असता, आम्हाला सुसाइड नोट आढळून आली नाही. आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. त्यावर कुणाचाही आक्षेप नाही.-आसाराम चोरमले,वरिष्ठ निरीक्षक, फ्रेजरपुरा पोलीस
एएसआयची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:13 PM
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. आपल्या आत्महत्येस वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असा संदेश त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केला आहे.
ठळक मुद्देमृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी : वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप