अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी परिसरातील जंगलात एका झाडाच्या फांदीला दोन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची घटना गत आठवडभरापूर्वी शुक्रवारी उघडकीस आली होती. दोघांचेही आत्महत्या ही गळफास घेऊनच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाला आहे. फ्रेजरपुरा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी ही माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षीय मुलीचा अहवाल पोलिसांना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला होता. तिने गळफास घेऊनच आत्महत्या केल्याची शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. मात्र, मुलाचा अहवाल येणे बाकी होते. तो अहवाल पोलिसांना इर्विनच्या डॉक्टरांनी शुक्रवारी दिला. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचीसुद्धा आत्महत्या ही गळफास घेऊनच झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, दोघांनाही आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दोघांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या लोकांचे बयान नोंदविले. घटनास्थळी किंवा मुलांच्या घरी सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम आहे. दोघेही आत्महत्येपूर्वी १४ मे रोजी घरून निघून गेले होते. मात्र, काही दिवसांनी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. प्रथमदर्शनी घातपात तर नाही ना, असा संशय होता. मात्र, पोलिसांनी तातडीने पंचनामा करून व घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीनुसार ही आत्महत्याच असल्याचे मत व्यक्त केले होते. पोलिसांनी त्या दिशेनेच चौकशी केली आहे.