मोर्शी तालुका: आत्मघाताचे सत्र सुरूच
मोर्शी : सततची नापिकी व कर्जाच्या डोंगराला कंटाळून २६ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास तालुक्यातील खानापूर येथे ही घटना उघड झाली. प्रवीश सतीश काळे (२६) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. त्याचे वडील दिव्यांग व कर्करुग्ण असल्याने प्रवीणच शेती कसत होता. तालुक्यात दीड महिन्यांच्या कालावधीत तीन शेतकºयांनी स्वत:चे आयुष्य संपविले.
मृत प्रवीशकडे मौजा खानापूर शिवारात दोन एकर शेती आहे. त्याने गावातीलच बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज घेऊन शेतात सोयाबीन, उडीद, मूंग व कपाशीची पेरणी केली. मात्र, हाती काहीच आले नाही. यामुळे कर्जाची फेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत तो होता. १९ फेब्रुवारी रोजी घरी रथसप्तमीसणात घरची मंडळी व्यस्त होती, तर वडील बाहेर गेले होते. कुणाचेही लक्ष नसल्याचे पाहून प्रवीशने घरातील एका भागात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती प्राप्त होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल उमाळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आणले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन केले. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. एकुलत्या मुलाने आत्महत्या केल्याने काळे कुटुंबीय हादरले आहेत. मृत प्रवीशच्या पश्चात एक विवाहित बहीणदेखील आहे.
--------