शिरखेड : लगतच्या विचोरी येथे एका ३० वर्षीय शेतकरी युवकाने विष घेऊन आत्महत्या केली. मनोज रामचंद्र मुळे असे मृताचे नाव आहे. १ जुलै रोजी कृषिदिनी ही घटना घडली.
मनोज मुळे यांनी वडिलोपार्जित दोन एकर शेतीत सोयाबीनची पेरणी केली होती. दहा एकर अन्य शेती लागवडीसाठी घेऊन त्यातसुद्धा पेरणी केली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पाऊस हुलकवणी देत असल्याने पेरलेल्या पिकाला मोड आली होती. पुढील पेरणी कशी करावी, या विवंचनेत मनोज मुळे यांनी राहत्या घरात विष प्राशन केले. याबाबतची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शुक्रवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मनोजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व वडील असा परिवार आहे. शिरखेड पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे.