कोरोना मदत योजनेला मुदतवाढ
अमरावती : कोरोना नियंत्रणाचे काम करताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत करण्याच्या योजनेला ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३० जून या काळात कोरोना नियंत्रणाच्या कामात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये दिले जातील.
--------------
फोटो पी १६ आसेगाव
पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण
आसेगाव पूर्णा : कोरोना काळात पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वच जण जिवाचे रान करत आहेत. गावोगावी भंगार जमा करणारा भंगारवाला तरुण आपल्या आईसोबत जिवावर उदार होऊन आयुष्याचा गाडा ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात हे चित्र नवे नाही. लॉकडाऊनने गरिबांचे जिणे मुश्किल केले आहे.
--------------
तिवसा तालुक्यात लसीकरण केंद्र वाढवा
कु-हा : तिवसा तालुक्यात लसीकरण केंद्र वाढवा, लसीकरणाची नोंदणी ऑफलाईन करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिवसा तालुकाध्यक्ष तुषार वाढणकर तहसीलदारांकडे केली. तालुका आरोग्य अधिकारी, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याविषयी जातीने लक्ष द्यावे व तालुक्यात कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भात तात्काळ लसीचा पुरवठा करुन लसीकरण केंद्र वाढवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
--------------
लसीकरण केंद्रच हॉटस्पॉट होण्याची भीती
आसेगाव पूर्णा : शनिवारी अचलपूर तालुक्यातील येसुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी केंद्रावर दुपारी २ ते ३ वाजतादरम्यान प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे ही लसीकरण केंद्रेच कोरोनाची हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
--------------
कडक निर्बंधामुळे शेतकरी सापडला संकटात
शिंदी बु : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदीतील कडक निर्बंधामुळे भाजीबाजार आणि चिल्लर विक्री पूर्णतः बंद आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना डिझेल देण्याचे आदेश दिले तरीही पेट्रोल पंपधारक शेतकऱ्यांना डिझेल देण्यास मनाई करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चाके डिझेलविना थांबल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहे. सर्व बाजार समित्या, भाजी मार्केट पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे चिल्लर भाजी विक्रेते व हात मजुरी करणारे अडचणीत आहेत. अशात शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून असल्याने टरबूज, मिरची आणि वांगीची नासाडी होत आहे.
--------------
लग्नात र्गदी झाल्यास कारवाई
पुसला : २२ मेपर्यंत सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नात मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा दोन तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांवर ती जबाबदारी टाकण्यात आली आहे.
--------------
शेतकऱ्यांनाही द्या टोकन, व्हॉट्सॲप ग्रुप करा
शेंदूरजनाघाट : २२ मे पर्यंत लागू असणाऱ्या लॉकडाउनमध्ये कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकानांनी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत घरपोच सेवा द्यावी. तालुका कृषी अधिकारी यांनी दुकानदार, शेतकरी बांधव यांचे व्हाॅटसॲप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीम अवलंबवावी. त्याचप्रमाणे, आवश्यक निविष्ठा बांधावरही पोहोचविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे कृषी केंद्रधारकांची मोठी पंचाईत झाली आहे.