आसेगाव पूर्णात चाकूने भोसकले
आसेगाव पूर्णा : येथील भवींद्र वाटाणे याला चाकूने भोसकण्यात आले. १४ मे रोजी रात्री १०.३० वाजता हाी घटना घडली. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी जखमीचे काका भारत वाटाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू सुरडकर (पोहा, ता. कारंजा लाड, ह.मु. आसेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
विवाहितेला घराबाहेर काढले
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील बेलोरा येथील एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. २५ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी रोशन भारत गवई व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
चंडिकापुरात वृद्धाला मारहाण
भातकुली : तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंडिकापूर येथील भीमराव गायकवाड (६८) यांच्या डोक्यावर वीट मारण्यात आली. १५ मे रोजी घरगुती कारणातून हा वाद झाला. खोलापूर पोलिसांनी आरोपी गणेश गायकवाड (३८, रा. चंडिकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
धारणी येथील तरुणाला शिवीगाळ
धारणी : येथील वाॅर्ड क्रमांक १३ मध्ये राहणाऱ्या मो. फारूख मो. उस्मान (३४) याला शिवीगाळ करण्यात आली. त्याला मारण्यासाठी रॉड काढण्यात आला. जिवाच्या भीतीने तो त्वरेने दुचाकीने धारणी पोहोचला. १४ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ढाकणा फाट्यावर ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी रोशन बेग, अब्बास बेग, अकिल बेग व अमीन (सर्व रा. धारणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
मायलेकीला जिवे मारण्याची धमकी
ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे एका महिलेसह तिच्या मुलीला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. घराच्या वादातून १३ मे रोजी हा प्रकार घडला. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी प्रशांत आकोटकर (४५), नीलेश राजस (३०) व वनदेव गुजर (३२, सर्व रा. घाटलाडकी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
रामगाव येथे मंदिरात चोरीचा प्रयत्न
दर्यापूर : तालुक्यातील रामगाव येथील हनुमान मंदिरातून मूर्तीचे चांदीचे डोळे चोरण्याचा प्रयत्न झाला. गावातील किसनराव वसू हे मंदिरात गेले असता, हा प्रकार उघड झाला. त्यांना पाहताच डोळे तेथेच टाकून पळ काढला. १५ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी संशयित शंकर मानकर (३५, रा. रामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
चांदूर रेल्वे येथे महिलेला मारहाण
चांदूर रेल्वे : येथील एका शाळेजवळ राहणाऱ्या महिलेला लाकडी झिल्पीने मारहाण करण्यात आली. १५ मे रोजी ही घटना घडली. चांदूूर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर तायडे (५६), प्रदीप तायडे (दोन्ही रा. सुभाष शाळेजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
अवैध रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील मिर्चापूर ते मार्डा मार्गादरम्यान अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास रेती असा ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १५ मे रोजी पहाटे ग्रामीण एलसीबीने ही कारवाई केली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपी प्रफुल राऊत (२२) व विनोद कडू (दोन्ही रा. मिर्चापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
केला. --------------
मार्डी येथे तरुणाला मारहाण
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील मार्डी येथे संतोष शंकर राठोड (३०) याला मारहाण करण्यात आली. १४ मे रोजी मार्डी येथे ही घटना घडली. तारांवर आकोडे टाकण्यास मनाई केल्याने ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपी उमेश राठोड व रमेश राठोड (दोघेही रा. मार्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
चिंचोली गवळी येथे चोरी
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथील एक वेल्डिंग वर्कशॉप फोडून ६२ हजार ३०० रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. ५ मे रोजी ही घटना घडली. १४ मे रोजी मोर्शी पोलिसांनी धीरज प्रधान यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
चिंचोली गवळी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथील विजय रामदास हटवार (२५) याच्यावर कुऱ्हाड व काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. १४ मे रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी किशोर हटवार (२८), चिमा हटवार (५५), संजय हटवार (२७) व सत्यम हटवार (२०) यांंच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
फोटो पी १७ काटपूर
लॉकडाऊनच्या काळात मुले रमली खेळात
काटपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळेला सरकारने सुट्टी दिल्याने अभ्यासापासून ग्रामीण भागातील दुरावलेली मुले घरात राहून कंटाळवाणी झाली आहेत. मोबाईल व कम्प्यूटर दूर सारून ही बच्चेकंपनी आता पारंपारिक खेळाकडे वळू लागली आहेत.
----------------
ग्रामीण भागातील लॉकडाऊन नावालाच
दर्यापूर : शासनाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले असले तरी दर्यापूर शहरात काही ना काही कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमीच वर्दळ सुरू आहे. शहरात अकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. तथापि, नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
---------------
लसीकरणाचा बोजवारा, नियोजन फिस्कटले
अमरावती : कोरोना लसीकरणासाठी निवडणुकीच्या मतदान केंद्रनिहाय आणि मतदान केंद्रावर लसीकरणाची योजना कार्यान्वित केल्यास गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. लसीकरण नियोजनाची जबाबदारी मतदान केंद्रनिहाय नगरसेवकांना दिल्यास प्रशासनास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
---------------
रिद्धपूर ग्रामस्थांकडून विविध मागण्या
चांदूर बाजार : तालुक्यातील रिद्धपूर येथील बस स्थानक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याला लागून चार फूट कच्ची नाली खोदकाम केली आहे. येथील बसस्थानक अतिशय लहान असल्यामुळे नागरिकांना उन्हात बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे येथे मोठा प्रवासी निवारा बांधण्याची मागणी समोर आली आहे.
---------------
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा
कुऱ्हा : सन २०२०-२१ या वर्षाचा पीकविमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, संत्री या पिकांचा विमा काढला. परंतु, दुसरे वर्षे सुरु झाले तरी विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. राज्य शासनाने त्वरित सन २०२०-२१ सालाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शेतकरी वर्गाची मागणी आहे.
-----------
सिमेंट रस्त्यांवर पार्किंगचे अतिक्रमण
वरूड : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ट्रक तसेच अन्य वाहनचालक आपली वाहने उभी करीत असल्याने हा महामार्ग अरुंद झाला आहे. परिणामी, अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. या प्रकारामुळे महामार्ग जणू वाहनतळ बनले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महामार्ग दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगने व्यापला आहे.
---------------------
साऊर-तळवेळ रस्त्याची दुरवस्था
टाकरखेडा शंभू : भातकुली व चांदूर बाजार तालुक्यांची सीमा जोडणाऱ्या साऊर ते तळवेल या दीड किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
लोंबकळणाऱ्या वीजतारा अपघाताला निमंत्रण
मोर्शी : शहरातून गेलेल्या वीज वाहिन्यावर झाडांच्या फांद्या लोंबकळत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. परिणामी, पावसाळ्यापूर्वी महावितरणने त्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी केली जात आहे. वादळी पाऊस झाल्यास वीजतारा तुटण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.
-------------
फोटो पी १७ शेंदूरजनाघाट
शेंदूरजनाघाट येथे मोफत तपासणी, औषध वाटप
शेंदूरजनाघाट : ‘सेवा ही संघटन’ अंतर्गत शेंदूरजनाघाट, बालापेठ, मलकापूर येथे रुग्णांच्या घरोघरी जाऊन तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अनिल बोंडे, वसुधा बोंडे, भाजपा शहराध्यक्ष नीलेश फुटाणे, नगर परिषद उपाध्यक्ष सुभाष गोरडे, नगरसेवक विशाल सावरकर, सतीश अकर्ते, जयप्रकाश भोंडेकर, धनराज अकर्ते, गजानन कपले, प्रज्योत खसारे, नीलेश वसुले, कुशल जोगेकर, अनिकेत कपिले, दिवाकर जोगेकर, अजिंक्य माहोरे, प्रतीक खेरडे उपस्थित होते.
-------------------