येवदा : नजीकच्या खुरचनपूर येथे सासऱ्याने जावयाला विटेने मारहाण केली. सासू व पत्नीने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. १८ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राजेश नामदेवराव लबडे यांच्या तक्रारीवरून जगन्नाथ मारोती डोंगरदिवे व दोन महिलांविरुद्ध येवदा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------
डोक्यावर मारली लाकडाची पाटी
खल्लार : घराच्या स्लॅबचे बांधकाम सुरू असताना संजय साहेबराव पर्वतकर (३६) यांना दोन महिलांनी पकडले व दीपक श्रीकृष्ण पर्वतकर याने डोक्यावर लाकडी पाटी मारून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मोचुर्डा येथे १८ मे रोजी ही घटना घडली. खल्लार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------
ट्रॅप कॅमेरा लंपास
धारणी : तालुक्यातील वनखंड क्रमांक ६३४ मध्ये लावलेला जुना ट्रॅप कॅमेरा अज्ञात चोरट्याने १५ मे च्या सुमारास चोरून नेला. वनरक्षक नीलेश कासदेकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------
नांदगाव पेठ येथे आज रक्तदान
नांदगाव पेठ : येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिरासह फळवाटप व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय नियमांच्या अधीन राहून सामाजिक अंतर राखून कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.
--------------
चर्मकार समाजाला आर्थिक मदतीची गरज
अमरावती : चर्मकार समाजातील गटाई कारागीर रस्त्याच्या कडेला बसून चर्मकार व्यवसाय करतात. सुरुवातीला चारशे - पाचशे रुपये रोजची मिळकत होती. परंतु, लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाल्याने दिवसाला शंभर रुपये मिळणे कठीण झाले आहे. चर्मकार समाजातील गटाई कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने चर्मकार समाजातील गटाई कारागिरांना व समाजातील मजूर वर्गातील गरीब कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी विनंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश जामठे यांनी केली आहे.
--------------
फोटो पी २० शिंदी
शिंदी बु. येथे होणार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
शिंदी बु : अचलपूर पं.स. माजी सभापती देवेंद्र पेटकर यांच्या पाठपुराव्यामुळे गावात लसीकरण सुरु होणार आहे. पेटकर यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांच्यासह प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी तिलक अरके यांना पत्र व्यवहार करीत त्वरित कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व्हावे याकरिता पाठपुरावा केला. काकडा, शिंदी, कुष्ठा या गावात शसीकरण होणार आहे.
--------------
गुरुजींना व्याज भुर्दंडाची छडी
अमरावती : जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन मागील २० वर्षांत एकदाही १ तारखेला झालेले नाहीत. वर्षभरापासून वेतनावरील तरतूद दरमहा होत असल्याने व त्यातही विलंब होत असल्याने शिक्षकांना वेतन वेळेत मिळत नसल्याचा आरोप आहे. परिणामी विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जावरील जादा व्याजाच्या भुर्दंडाचा छडीमार शिक्षकांना सहन करावा लागत आहे.
--------------
फोटो पी २० शेंदोळा
वृक्षारोपण, स्टिमर मशिन भेट
शेंदोळा खुर्द : पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवशी तिवसा पंचायत समितीचे उपसभापती शरद वानखडे यांच्यातर्फे शिवणगाव येथील आशा सेविका यांना नागरिकांच्या, रुग्णांच्या सेवेसाठी स्टिमर मशिन भेट देण्यात आल्या. तथा वृक्षारोपण देखील करण्यात आले.
--------------
६४ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी
अमरावती : स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे यांच्या उपस्थितीत १८ मे रोजी राजापेठ बसस्थानकाजवळ मोबाईल व्हॅन आरोग्य विभागाचे टीमद्वारे ६४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात आली. स्वास्थ निरीक्षक धनिराम कलोसे, मनीष हडाले, महेश पळसकर, प्रीती दाभाडे, योगेश कंडारे, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
--------------
चांदूर रेल्वेत वृक्षारोपण
चांदूर रेल्वे : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या टीडीआरएफ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त टीडीआरएफ जवानांनी विविध ठिकाणी ५० वृक्षांची लागवड केली. त्या वृक्षांचे संगोपणदेखील करण्यात येणार आहे. यावेळी संचालक हरिश्चंद्र राठोड उपस्थित होते.