परतवाडा : येथील खिरणी बगीचा भागातील खड्ड्यात पडून दगावलेल्या दीक्षांत दीपक गवई या मुलाच्या मृत्यूप्रकरणी परतवाडा पोलिसांनी १९ मे रोजी आरोपी अनूप राकेश मसराम (३०, खिरणी बगीचा) व अचलपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याविरुद्ध भादंविचे कलम ३०४ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ४ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली होती. अनूप मसराम याने खड्डा खणून ठेवला. त्यामध्ये नगर परिषदेची पाईप लाईन लीकेज झाल्याने पाणी साचले. त्यामुळे तेथे खड्डा आहे, हे दीक्षांतच्या लक्षात आले नाही. त्यात पडून तो दगावला.
----------------
गरजदरी येथे महिलेला मारहाण
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गरजदरी येथील एका महिलेला पाणी भरण्याच्या कारणावरून डोक्यावर गुंड मारण्यात आला. १९ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आरोपी संजू काळे (रा. गरजदरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
खारीपुरा येथे महिलांमध्ये जुंपली
वरूड : अंगावर पाणी का फेकले, अशी विचारणा केली असता, ३१ वर्षीय महिलेला अन्य एका महिलेने चावा घेतला. शिवीगाळ करून पुन्हा मारण्याची धमकी दिली. १९ मे रोजी हा प्रकार घडला. वरूड पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------
टेंभूरखेडा-गव्हाणकुंड रोडवरून दुचाकी लांबविली
वरूड: तालुक्यातील टेंभूरखेडा-गव्हाणकुंड रोडवरून एमएच ३० सी २६२४ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. योगेश गिद (४०, टेंभूरखेडा) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------------
चांदूर रेल्वेत साडी सेंटरला दंड
चांदूर रेल्वे : नगरपालिका मुख्यधिकाऱ्यांनी येथील राराणी साडी सेंटरला संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड ठोठावला. यावेळी पालिका कर्मचारी नितीन इमले, विजय रताळे, राजेश शिर्के, संजय करसे, गिरीधर चवरे, नितीन नंदनवार हे उपस्थित होते.
--------
फोटो पी २१ वणी बेलखेडा
वणी बेलखेडा येथे आंदोलन
चांदूर बाजार : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली २० मे रोजी प्रहार शेतकरी संघटनेने वणी बेलखेडा गावातील चौका- चौकांत खताची भाववाढ व तूर, मूग, उडिदाची आयात या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ ताली-थाली बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात वणी बेलखेडा येथील सरपंच, उपसरपंच, प्रफुल नवघरे, सुनील मोहोड, अतुल राऊत, अमोल शेळके, शिवदास शेळके, सुमीत शेळके, अतुल शेळके, गौरव राऊत, अनिल नवघरे सहभागी झाले.
--------------
परतवाड्यात २७ जणांची तपासणी
परतवाडा : येथील जयस्तंभ चौकात २० मे रोजी २७ व्यक्तींची रॅपिड अॅन्टिजेन चाचणी करण्यात आली. यापैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोरोना रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
---------
दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई
येवदा : येथील स्मशानभूमीजवळील शहानूर नदीकाठावर देशी दारू विक्री करीत असलेला महादेव उकडार्जी श्रीनाथ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून ठाणेदार अमुल बच्छाव यांच्या मार्गदर्शनात अनिल जाधव यांनी त्याच्याकडून ९३० रुपयांची देशी दारू जप्त केली.
--------------
फोटो पी २१ दर्यापूर
बॅकेसमोर गर्दी कशी?
दर्यापूर : बनोसा परिसरातील मुख्य बाजारपेठेतील सेंट्रल बँकेसमोरची गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरली आहे. ही बँक दुसऱ्या मजल्यावर असून, एकावेळी एकालाच जिन्यावरून प्रवेश दिला जातो. त्यामुळे रांगेतील अन्य ग्राहक भर उन्हात तिष्ठत उभे ठेवले जातात. त्याकडे बँक व्यवस्थापनाने सोयीस्कर दुर्लक्ष चालविल्याचा आरोप आहे.
--------
वेलकम पॉईंटवर कोरोना तपासणी
अमरावती : वेलकम पाँईट येथे कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने २० मे रोजी मोहीम राबविण्यात आली. अकारण फिरणाऱ्या १८० नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यावेळी सहायक क्षेत्रीय अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शेख, स्वास्थ निरीक्षक रोहित हडाले, डवरे, गोरले, सर्व स्वास्थ निरीक्षक व वसुली लिपिक उपस्थित होते.
----------------
त्या शिक्षकांचे निलंबन रद्द करा
अमरावती : जालना जिल्हा परिषद अंतर्गत परतूर येथील आरोग्य केंद्रावर एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्याच्या कारणावरून तेथील आरोग्य केंद्रात नियुक्तीवर असलेल्या शिक्षकांवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू तसेच जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
------
वरूड, मोर्शी तालुक्यातील पीएचसी बांधकामासाठी हवा निधी
वरुड : मोर्शी, वरूड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या इमारतींसाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आमदारांकडून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
------------
फोटो पी २१ भुसाटे
बाबाराव भुसाटे
कुऱ्हा : ज्येष्ठ नागरिक बाबाराव रामकृष्ण भुसाटे (७६, रा. मारडा) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
-------------
फोटो पी २१ मे फ्लॉवर
अंजनगावात फुलले मे फ्लॉवर
अंजनगाव सुर्जी : येथील पंजाबराव धोटे यांच्या घरी कुंडीमध्ये मे फ्लॉवरची तीन फुले उगवली. केवळ मे महिन्यात ही फुले उगवतात. नंतर पूर्ण वर्ष त्याच्या फुलण्याची प्रतीक्षा करावी लागते.
------------