चांदूर बाजार : तालुक्यातील काजळी देऊरवाडा येथे प्रशांत नागोराव वानखडे (३०) याच्यावर विळ्याने वार करण्यात आला. २१ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी अमोल अवसरमोल, राजू अवसरमोल (दोन्ही रा. काजळी देउरवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
एकदरा येथे अपघात, तरुणी जखमी
वरूड : तालुक्यातील एकदरा येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली. २२ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. अश्विनी राऊत असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी एमएच ३१ इके ३७२७ क्रमांकाच्या कारचा चालक दिवाकर चंपतराव राऊत (३५, एकदरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
वरूडमधून सायकल लंपास
वरूड : येथील आदर्शनगर भागातून आठ हजार रुपयांची सायकल लंपास करण्यात आली. २१ मे रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी रवींद्रसिंह गहलोद (३५, आदर्शनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
येवदा येथे मारहाण
येवदा : रस्त्यावर दारू विकू नकोस, असे म्हटल्याने शंकर रंगराव शेळके (४३, रा. येवदा) यांना विटेने मारहाण करण्यात आली. २२ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपी संजय श्यामराव शेळके (५५, येवदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
दर्यापूर फाट्यावर ट्रक उलटला
आसेगाव पूर्णा : अमरावती ते परतवाडा मार्गातील दर्यापूर फाट्याजवळ भरधाव ट्रक कडुनिंबाच्या झाडावर धडकला. त्यामुळे तो उलटला. १९ मे रोजी स्टअरिंग रॉड तुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी राधेश्याम सुखदेव प्रजापती (रा. टाकरखेडा पूर्णा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
बिजुधावडी येथून ट्रॅक्टर जप्त
धारणी : तालुक्यातील बिजुधावडी येथून रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. २२ मे रोजी धारणी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी योगेश प्रजापती (ह.मु. बिजुधावडी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. गडगा नदीच्या पात्रातून ती रेती चोरण्यात आली होती.
----------
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
धारणी : तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. २२ मे रोजी रात्री १ ते २ च्या सुमारास हा प्रकार घडला. धारणी पोलिसांनी आमीन बशीर शेख (रा. सावरलीखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
निमखेड बाजारमध्ये मारहाण
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार येथे प्रकाश सोनोने (५९) यांना मारहाण करण्यात आली. २२ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ऋषीकेश गायगोले, शांताराम गायगोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात प्रकाश सोनोने, बाळकृष्ण सोनोने, श्रीकृष्ण सहारे (सर्व, रा. निमखेड बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------
वृक्षलागवडीच्या खड्डे खोदकामात अनियमितता
शिंदी बु. : वृक्ष लागवडीकरिता येणाऱ्या शिंदी ते टवलार रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत खड्ड्यांचे खोदकाम सुरू आहे. जी कामे मजुरांच्या हाताने करायला पाहिजे, ती जेसीबीने केली जात आहेत. वनरक्षक रेचे यांना माहिती दिली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याविषयी वरिष्ठांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मो. जुबेर शेख इस्माईल यांनी केली आहे.
------------
पथ्रोट भागात पांदण रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरुवात
पथ्रोट : शहानूर परिसरातील मौजे मलकापूर, रामापूर ते जहानपूर, थापेरा नाला ते जहानपूर या पांदण रस्त्याचे रुंदीकरण लक्षात घेता, सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. शहानूर धरणाचे अतिरिक्त पाणी व पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे पांदण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी ती कामे व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
----
रेतीअभावी रखडली घरकुलाची कामे
धारणी : परप्रांतातून येणाऱ्या गौण खनिजांवरसुद्धा बंदी आणली गेली आहे. यावर तोडगा काढण्यात शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे उपविभागातील नव्या बांधकामांवर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
--------------
शेतकऱ्यांना केव्हा मिळणार वीज जोडणी?
अंजनगाव सुर्जी : नवीन कृषिपंपांना वीज खांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब वीज वाहिनीद्वारे तीन महिन्यांत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शेतकरी वर्ग हा नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्याची मागणी होत आहे.
--------------
वरूड तालुक्यात बोअवर होतात तरी कशा?
वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना, त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना, अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत.