अचलपूर : येथील एका ३९ वर्षीय महिलेची ४५ हजार ६७८ रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. २७ मे रोजी ही घटना घडली. त्या महिलेने ऑनलाईन शॉपिंगद्वारे दोन कॉलेज बॅग ऑर्डर केल्या होत्या. त्या पसंत न पडल्याने परत केल्या. फोन-पेवरून पैसे परत करण्याच्या नावावर ९८८३४१५६२८ या मोबाईलधारकाने त्या महिलेच्या खातेक्रमांकाचे शेवटचे पाच अंक घेऊन त्यांच्या खात्यातून ४५,६७८ रुपये विनासंमती काढून घेतले. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी त्या मोबाईल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
गुलजारपुरा येथे महिलेचा विनयभंग
अंजनगाव सुर्जी : येथील गुलजारपुरा भागात एका २२ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. २९ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी संजय तायडे (अंजनगाव सुर्जी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
आमला येथे मारहाण
दर्यापूर : तालुक्यातील आमला येथे भारत सोळंके (३८), त्याची पत्नी व मुलीला मारहाण करण्यात आली. कचरा फेकण्याच्या वादातून २८ मे रोजी ही घटना घडली. दर्यापूर पोलिसांनी आरोपी राजेश सोळंके व निरंजन सोळंके (दोन्ही रा. आमला) यांच्याविरुद्धगुन्हा दाखल केला.
--------------
दर्यापुरातील शासकीय निवासस्थान फोडले
दर्यापूर : येथील एसटी डेपो परिसरातील शासकीय निवासस्थान फोडून ७१ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. २१ ते २९ मे दरम्यान ही घटना घडली. जयकुमार इंगोले यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही लंपास करण्यात आली.
---------------
घरगुती कारणातून महिलेला मारहाण
दर्यापूर : तालुक्यातील गायवाडी येथील एका २५ वर्षीय महिलेला घरगुती कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. २९ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. दर्यापूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी राजेश वानखडे (३०, रा. गायवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
पुसला जिल्हा परिषद शाळेतून टीव्ही लंपास
पुसला : येथील जिल्हा परिषदेच्या पाचव्या वर्गातील १२ हजार रुपये किमतीची एलईडी टीव्ही लंपास करण्यात आली. २७ मे रोजी हा प्रकार घडला. मुख्याध्यापक भगवंत गजभिये (४५) यांच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
पवनी संक्राजी येथे तरुणाला मारहाण
वरूड : तालुक्यातील पवनी संक्राजी येथे नंदू परतेती (३९) याला मारहाण करण्यात आली. गावातील एकाला खोटे का सांगितले, अशी विचारणा करीत २९ मे रोजी ही घटना घडली. वरूड पोलिसांनी आरोपी अनिल ठाकरे (४५, पवनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
नांदगाव खंडेश्वर : येथील चांदूर रेल्वे रोडवर ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत शेख सलीम (नांदगाव) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. २५ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक सुरेंद्र नारायण टेकाम (ह.मु. नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------
विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ
कावली वसाड : येथील एका २४ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. नांदवायचे नाही म्हणून पती व सासरच्या मंडळीने छळ चालविल्याची तक्रार २९ मे रोजी त्या विवाहितेने दत्तापूर पोलिसांत नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार केळोदे, गणेश केळोदे, विनय केळोदे व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
फोटो पी ३१ दिपाली
सुवर्णकन्या दीपाली गावनेरचा बजरंग दलाच्यावतीने सत्कार
नांदगाव पेठ : येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीपाली शेषराव गावनेर हिने इतिहास विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून संत गाडगेबाबा विद्यपीठ स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. बजरंग दलाचे विभाग संयोजक संतोषसिंह गहरवार, जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर सुंदरकर, विद्यार्थी परिषदेचे अभिजित टेटे, आकाश साकोर, शेषराव गावनेर, अनिल हिवे, गोलू शेंदरकर, राजू दुबे, रोशन बोकडे, विपुल दुधे, ओम कोठार, अनुज गावनेर, नंदिनी गहरवार उपस्थित होते.
------------
शिक्षकांच्या बदलीसाठी लवकरच नवी प्रणाली
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी नव्याने सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. ही समिती पाच जणांची असून, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह तीन सदस्य आहेत.
-----------
कुऱ्हा-अंंजनसिंगी रस्ता बांधकाम
वाहतुकीस अडथळा
कुऱ्हा : कुऱ्हा ते अंजनसिंगी रोडचे काम सुरू असताना २९ मे रोजी आलेल्या पावसाने दोन्ही बाजूला गटार निर्माण झाले. वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन वाहनधारकांना कसरत करावी लागली. वाहनांच्या चाकांना माती चिटकत असल्याने चारचाकी चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
-----------