ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. १२ जून रोजी रात्री हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी १३ जून रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
घाटलाडकी येथे इसमाला मारहाण
ब्राम्हणवाडा थडी : घाटलाडकी येथील संतोष शंकर कुरवाडे (४३) यांना लोखंडी सळाखीने मारहाण करण्यात आली. १३ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी ओंकार कुरवाडे, गजानन कुरवाडे, गोपाळ कुरवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------
रेतीची अवैध वाहतूक, ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
चांदूरबाजार: जवळा शहापूर ते शिरजगाव अर्डक रोडवरून रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. १३ जून रोजी मंडळ अधिकारी गजानन दाते यांनी ही कारवाई केली. चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टरचालक मनोज वानखडे (रा. सर्फाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------------
भानखेडा येथे विवाहितेचा छळ
चांदूर रेल्वे : तालुक्यातील भानखेड येथील एका २४ वर्षीय विवाहितेचा ५० हजार रुपये व सोन्याच्या अंगठीसाठी छळ करण्यात आला. ५ जून २०१९ पासून सासरच्या मंडळीने छळ चालविल्याची तक्रार १३ जून रोजी चांदूर पोलिसांत नोंदविली गेली. याप्रकरणी मनीष ढोणे, रामराव ढोणे व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------
चांदूर रेल्वे येथून दुचाकी लांबविली
चांदूर रेल्वे : विरूळ चौक भागातून आकाश ठाकरे (३०, रा. राजहिलनगर, अमरावती) यांची एमएच २७ - १६९ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेण्यात आली. ते आरोपी शरद चौधरी (रा. जयनगर, अमरावती) याच्यासोबत अमरावतीहून धामणगावकडे जात होते. ते दोघेही चांदूर रेल्वे येथे थांबले. तहसील कार्यालयातृून मुद्रांक आणतो, अशी बतावणी करून आरोपी शरद दुचाकी घेऊन गेला. २६ मे रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी १३ जून रोजी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
बाभळी येथे महिलेला मारहाण
दर्यापूर : बाभळी येथील एका महिलेसह तिच्या भाच्याला मारहाण तथा शिवीगाळ करण्यात आली. १३ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी हारूण शाह यांच्या तक्रारीवरून आरोपी पवन उमक (२२, वाकोडेपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
‘त्या’ अपघातप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पांढरी येथे १३ जून रोजी झालेल्या अपघातात हर्ष देशमुख (५५, रा. लाखनवाडी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे चुलतभाऊ साहेबराव देशमुख यांच्या तक्रारीवरून एमएच २७ सीएम ३६४९ या क्रमांकाच्या दुचाकीचा चालक कुणाल खनवे (रा. पथ्रोट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
अंजनगाव बाजार समितीतून तुरीचा कट्टा लंपास
अंजनगाव सुर्जी : स्थानिक बाजार समितीतील एका अडत दुकानातून ६० किलो वजनाचा तुरीचा कट्टा लंपास करण्यात आला. १३ जून रोजी सकाळी हा प्रकार उघड झाला. सीसीटीव्हीतदेखील हा प्रकार कैद झाला. याप्रकरणी मो. सिद्दीक मो. सादिक (३५, मोमीनपुरा) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
दाभी शिवारात महिलेला मारहाण
वरूड : तालुक्यातील दाभी शिवारात एका ४३ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. शेत पेरणीच्या कारणावरून हा वाद झाला. १३ जून रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी सतीश सोनारे (४८, रा. सुरळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
मनपातर्फे बाजार समितीमध्ये कोविड-१९ लसीकरण
अमरावती : १४ जून रोजी येथील बाजार समितीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत मोबाईल व्हॅनद्वारे ४५ वर्षांहूमन अधिक वयाच्या लाभार्थींना कोविड-१९ लस देण्यात आली. बाजार समितीमध्ये दैनंदिन व्यवहाराकरिता येणारे सामान्य नागरिक, अडते व समितीच्या सदस्यांना या लसीकरणाचा लाभ देण्यात आला.
------------
मनसे तिवसा तालुकातर्फे रक्तदान शिबिर
कुऱ्हा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिवसा तालुक्याच्यावतीने १४ जून रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. गुरुकुंज मोझरी येथे झालेल्या या शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मनसे पदाधिकारी कपिल निर्गुण, जिल्हा उपाध्यक्ष चंदेश मानकर उपस्थित होते. पीडीएमसीच्या चमूने रक्तसंकलन केले.
-----------------
श्री हव्याप्र मंडळात शैक्षणिक चर्चासत्र
अमरावती : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, शिक्षक व पालकांमध्ये चिंतेचे वातारवण आहे. या समस्येवर आता शासनाने सकारात्मक पुढाकार घेत राज्यासह अमरावती जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये कोविड त्रिसूत्रीनुसार सुरू करण्याची गरज असल्याचे मत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रामध्ये तज्ज्ञ मान्यवरांनी व्यक्त केले.
----------
उपचाराअभावी जखमी हरिणाचा मृत्यू
तळवेल : चांदुर बाजार तालुक्यातील खरवाडी येथील एका शेतामध्ये कुत्र्यांनी हरणाला जखमी केले होते. गावकऱ्यांनी त्याचा कुत्र्यांपासून बचाव करून वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, वाहन न पाठवता केवळ वनमजुराला पाठविण्यात आले. त्यामुळे त्या हरणावर उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी, त्या हरणाने अखेरचा श्वास घेतला.