वरूड : तालुक्यातील एकदरा येथे बंडू सुरजुसे व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. घरासमोर दारू विकू नका, असे म्हटल्याने हा वाद झाला. ४ मे रोजी रात्री ही घटना घडली. वरूड पोलिसांनी याप्रकरणी सागर पाटील व शुभम पाटील (रा. एकदरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
माहेरहून १० लाख आणण्यासाठी छळ
अमरावती : लग्नात हुंड्यामध्ये काहीही दिले नाही, असे बजावून माहेराहून १० लाख रुपये आणण्यासाठी २८ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी ५ मे रोजी वरूड पोलिसांनी आरोपी गजानन दापूरकर, विश्वेश्वर दापूरकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
अमरावती : वरूड शहरातून एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. ५ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी ५ मे रोजी रात्री आरोपी आकाश गुर्वे (२२) व राजा गुर्वे (दोघेही रा. आठवडी बाजार, वरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
लखारा शिवारातून मोटर, केबल लंपास
अमरावती : वरूड तालुक्यातील लखारा शिवारातून मोटर व केबल वायर असा ११ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ३ ते ४ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी सुनील यावलकर (५४) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------
करजगावातून ट्रॅक्टर बॅटरी लंपास
अमरावती : वरूड तालुक्यातील करजगाव येथून ट्रॅक्टरची बॅटरी लंपास करण्यात आली. ५ मे रोजी ही घटना घडली. बेनोडा पोलिसांनी याप्रकरणी दामोदर कडू (६०, करजगाव) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
अपघातग्रस्त तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
अमरावती : मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर ते लेहगाव मार्गावरील तळेगाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात राजा सोळंकी (२५, रा. नवेगाव, ता. आठनेर) याचा मृत्यू झाला. १२ एप्रिल रोजी हा अपघात घडला होता. ५ मे रोजी प्रफुल सावरकर (रा. तळेगाव दाभेरी) यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
खोपडा येथे काका पुतण्याला मारहाण
अमरावती: मोर्शी तालुक्यातील खोपडा येथे आदित्य लुंगे (१९) व त्याच्या काकाला मारहाण करण्यात आली. ५ मे रोजी सकाळी ही घटना घडली. शिरखेड पोलिसांनी आरोपी मंगेश लांडे, गोवर्धन लांडे, मनोज लांडे, पवन लांडे, हरिदास लुंगे, रूपेश लांडे, निवृत्ती लांडे व अन्य दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
--------
शेणाचा उकिरड्यावरून खोपडा येथे मारहाण
अमरावती : नाली साफ करण्यापूर्वी शेणाचा उकिरडा का उचलला, या कारणावरून वाद करत मंगेश लांडे (३२) याला मारहाण करण्यात आली. ५ मे रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी आरोपी आदित्य लुंगे, सुरेश लुंगे, दिलीप लुंगे, राजेश लुंगे, प्रवीण उमाळे, सचिन भोकरे (सर्व रा. खोपडा) व एक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
सात लाखांसाठी विवाहितेचा छळ
अमरावती : एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासाठी तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. ३ जानेवारी ते ५ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी पवन काळे, प्रभाकर काळे, अंकुश काळे व एक महिला (सर्व रा. कमला पार्क, यवतमाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------
महिलेला चावा, अंगठा निकामी
अमरावती : धामणगाव रेल्वे येथील एका ६० वर्षीय महिलेच्या अंगठ्याला चावा घेण्यात आला. त्यामुळे त्या महिलेचा अंगठा निकामी झाला. मुलांचा वाद सोडविण्यास गेली असता ५ मे रोजी ही घटना घडली. दत्तापूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी योगेश कुरील (३०, मोचीपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------------
आष्टा येथून मोबाईल लंपास
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा येथील पवन जाधव यांचा मोबाईल चोरीला गेला. ५ मे रोजी दुपारी ही घटना घडली. मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
एक लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ
अमरावती: माहेरून एक लाख आणण्याची मागणी पूर्ण न केल्याने एका विवाहितेला मारहाण करण्यात आली तसेच दुसरे लग्न करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी शेख रशिद शेख रऊफ, शेख रऊफ व दोन महिला (सर्व रा. बार्शीटाकळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
विवाहितेचा विनयभंग, मारहाण
अमरावती: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथील एका २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. आरडाओरड केल्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ५ मे रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. लोणी पोलिसांनी आरोपी शुभम सुभाष सगळे (१९, लोणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
बाबंदा येथे मारहाण
अमरावती : धारणी तालुक्यातील बाबंदा येथे ब्रिजलाल चतुर (२३) याला काठीने मारहाण करण्यात आली. ५ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी शंकर चतुर, सचिन चतुर, रोशन चतुर (सर्व रा. बाबंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
चांदूर बाजारात तरुणाला चाकूने भोसकले
अमरावती : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला समजावण्यासाठी गेलेल्या अतुल तिडके (३२, रा. ठाकूरपुरा, चांदूर बाजार) याला डाव्या हातावर चाकूने भोसकण्यात आले. ५ मे रोजी दुपारी ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी संतोष सूर्यवंशी (रा. चांदूर बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------
पथ्रोट भागातून मुलीला पळविले
अमरावती: अचलपूर तालुक्यातील पथ्रोट भागातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या इसमाच्या १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. २२ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी आरोपी स्वप्निल बिसन वानखडे (२५, पांढरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------