तळेगाव दशासर : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, आठ वर्षानंतरही ती पूर्णत्वास गेलेली नाही. गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून, इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे.
---------------
मजीप्राने खोदून ठेवले रस्ते
मंगरूळ दस्तगीर : पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे हे गाव त्या खोदकामामुळे भकास झाले आहे. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांंकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. या गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने किरकोळ अपघातदेखील वाढले आहेत.
----------------
फोटो पी २३ कारवाई
पाच व्यापारी प्रतिष्ठानांवर कारवाई
अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर निर्बंध असतानादेखील नियम तोडणाऱ्या पाच व्यापारी प्रतिष्ठानांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आदित्य झेरॉक्स (फरशी स्टॉप), सोहित सेल्स (विलासनगर), वेलकम सीट कवर (दसरा मैदान), पुणेरी चहा (रामपुरी कॅम्प), वन्स मोर सलून (पलाश लाइन) या आस्थापनांवर राजापेठ पोलीस व गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या तक्रारीनुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.
---------------
बंदी कागदावरच, बोअर सुरूच
वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना, त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केला जात आहेत.
---------------
‘ते’ खुले रोहित्र झाकणबंद करण्याची मागणी
करजगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला लागून आझाद चौकात खुले रोहित्र आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. महावितरणला आणखी प्राणांतिक अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल करजगाववासीयांनी उपस्थित केला आहे.
---------------
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पाणीटंचाई
चिखलदरा : तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ३५ गावातील पाणीटंचाई ‘जैसे थे’ आहे. अनेक गावांत टँकरवारी सुरू झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.