--------------------
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
शिरजगाव कसबा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत खरपी ते बहिरम मार्गावर युवकाच्या दुचाकी एमएच ३२ यू ७००६ ला झालेल्या अपघातात तार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. हरिचंद गुलचंद दखने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत राहल गोपिचंद दखनेिवरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------------------
महिलेला शिवीगाळ, मारहाण
आसेगाव : घरात घुसून महिलेला लेकरासह घरी चालण्याचा तगादा लावला. महिलेने नकार दिल्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना युसुर्णा येथे १० जुलै रोजी घडली. फिर्यादी अरुण च-हाटे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी प्रवीण डाखोरे (३५, रा. येसुर्णा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ
खोलापूर : विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. १९ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी प्रफुल्ल पंजाबराव तेलमोरे (२७), प्रमिला पंजाबराव तेलमोरे (५५, रा. दारापूर, पांढरी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------
पोलिसात तक्रार दिल्याने महिलेला मारहाण
मंगरुळ चव्हाळा : उकिरड्यावर कचरा टाकण्यास गेलेल्या महिलेला माझे नावाची तक्रार पोलिसात का दिली, असे विचारून थापडा मारल्या, पतीच्या बोटाला चावा घेतल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ९ वाजता घडली. तक्रारीवरून मंगरुळ पोलिसांनी श्याम भगवान कुणबीथोप (४२) श्याम पुंडलिक पांडे (३५, रा. गाडेगाव)विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------------
घरकुल यादीतून नाव वगळल्याने मारहाण
मंगरुळ चव्हाळा : घरकुलाच्या यादीतून माझ्या आईचे नाव का वगळले, असा प्रश्न करून दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता गोडेगाव येथे घडली. श्या भगवान कुणबीथोप यांच्या तक्रारीवरून मंगरुळ पोलिसांनी छाया दीपक भोंगरे, दीपक आनंदराव भोंगरे, नितेश नामदेवराव भोंगरे, चेतन नामदेवराव भोंगरे (सर्व रा. गोडेगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
रहिमापूर : मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून इसमाने घरात प्रवेश करून पाण्याची मागणी केली. १२ वर्षीय मुलीने त्याला पाणी दिले असता, १०० रुपये देतो, एक मुका दे, असे सांगितले. मुलीने हा प्रकार आईजवळ कथन केल्याने दिलेल्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी अशोक किसन पळसकर (६२) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.
--------------------------
क्षुल्लक कारणावरून इसमाला मारहाण
पथ्रोट : नजीकच्या बोराळा उपातखेड येथे सार्वजिनक कार्यक्रमात आरडा-ओरड करणाऱ्या व्यक्तीला हटकल्याने मारहाण करण्यात आली. ही घटना ९ जुलै सायंकाळी घडली. दीपक शेषराव महल्ले यांच्या तक्रारीवरून प्रेमलाल छोटेलाल भुसूम, मणिराम मन्साराम तांडिलकर (रा. बोराळा) विरुद्ध पथ्रोट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-----------
विवाहितेचा पैशासाठी मानसिक, शारिरीक छळ
धारणी : वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास तगादा लावत ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार धारणी पोलिसांना प्राप्त झाली. यावरून प्रदीप ब्रिजलाल मावस्कर (३३, रा. भोकरबर्डी) विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
------------------
संशयावरून महिलेला खुर्चीने मारहाण
धारणी : फोनवर संवाद साधत असताना संशय व्यक्त करीत महिलेला खुर्चीने मारहाण केल्याची घटना १० जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली. तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी अंकुश दीपक गिरी (३५, रा. नांदुरी)विरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
जिवंत विद्युत तारेशी छेडछाड
चांदूर रेल्वे : वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या नादात खांबावर चढून तारांना छेडछाड केल्याने नागरिकांनी हटकले असता, तिसऱ्याच व्यक्तीवर राग काढत मारहाण केल्याची घटना पळसखेड येथे १० जुलै रोजी घडली. बंटी केवलसाद राऊत यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी नरेश नारायण कांबळे, सुरेखा नरेश कांबळे विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
मद्यपी पतीकडून विवाहितेचा छळ
धामणगाव रेल्वे : प्रेमविवाहानंतर काही दिवसांतच पतीला दारुचे व्यसन जडल्याने माहेरहून पैशाची मागणी होऊ लागली. १० हजार रुपये आणून दिल्यानंतरही छळ होत असल्याच्या तक्रारीवरून आरोपी अक्षय नेहरू वनवे (२८), प्रेमिला नेहरू वनवे (५२), नेहरू त्र्यंबक वनवे(६२, रा. माहुली जहागीर) शिल्पा उमेश धोटे (३२), पल्लवी अमित चौधरी(रा. जळगाव खांदेश) विरुद्ध दत्तापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------------
चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक
तिवसा : वरखेडनजीक एमएच ३१ ईए २४२६ क्रमांकाच्या वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीला धडला लागून तिघे जखमी झाल्याची घटना ७ जुलै रोजी घडली. लिलाधर रामाजी वाटकर (तारखेड) यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
१६ हजार रुपये लंपास
मोर्शी : लग्नकार्यात सहभागी होण्याकरिता गेल्याची संधी पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश करून १६ हजार रुपये लंपास केल्याची घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.