अमरावती : उन्हाळ्यात हंगामी व्यवसाय करणारे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडचणीत सापडले आहे. विस्कटलेली आर्थिक घडी बसविताना या व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्यात रसवंतीगृह, शीतपेयाची दुकाने, कलिंगड व माट विक्री करणारे तसेच हातगाड्यांवर कुफी, आईस्क्रीम विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी मार्च महिन्यातच हंगामात लॉकडाऊन सुरू झाला होता. ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. यामुळे पुढे येणारा उन्हाळी हंगाम चांगला होईल, अशी आशा व्यावसायिकांना होती. काहींनी तर यावर्षी फेब्रुवारीपासूनच हंगामाची जोरदार तयारी सुरू केली होती. दरम्यान अनेकांनी व्यवसाय सुरू केले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येताच व्यावसायिकांच्या आशेवर पाणी फिरले. शहरासह ग्रामीण भागात मार्च ते मे या तीन महिन्यांत अनेकजण हंगामी व्यवसाय करतात. या काळात मिळणाऱ्या उत्पन्नातून पुढील नऊ महिन्यांसाठी आर्थिक तजवीज करून ठेवली जाते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे सर्व व्यवसाय बंद राहिल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
दोन वर्षांपासून व्यवसाय संकटात
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत शीतपेयाची मागणी अधिक असते. त्यामुळे मार्च ते एप्रिल, मे महिन्यापर्यंत शीतपेयाकडे अधिक कल असतो. परंतु गतवर्षीपासून कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत शहरासह ग्रामीण भागात लागणारी रसवंती, शीतपेयाची दुकाने, तसेच कुल्फी, बर्फ गोला विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहे.