- गजानन मोहोड
अमरावती : विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. यापैकी पाच तालुक्यात भुजलस्तर तीन मीटरपेक्षा जास्त खाली गेला. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा उन्हाळाअखेर ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर हे निष्कर्ष नोंदविण्यात आले. राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता, ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण पाषाणाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. भेगा व सांधे निर्माण झाल्याने या पाषाणात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भुजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. गतवर्षी नैसर्गिक पुर्नभरण झालेले नसले तरी अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे स्थिती समाधानकारक आहे.सद्यस्थितीत २५ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली. यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १२ व अमरावती जिल्ह्यातील ८ तालुके आहेत. १५ तालुक्यांची भूजल पातळीत १ ते २ मीटरपर्यंत कमी आली. यात सर्वाधिक ६ तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अमरावती २, अकोला ४ वाशिम २ व बुलडाणा जिल्ह्यातील १ तालुक्याचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यत ११ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आणि अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यांचा समावेश आहे. तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी पाच तालुक्यात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ३ व अमरावती जिल्ह्यातील २ तालुक्याचा समावेश आहे.
एकूण २८ टक्के क्षेत्र पाणवहनराज्यातील मुख्य नद्यांच्या खो-याची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याचीदेखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के म्हणजेच १ लाख ३५ हजार ३८३ चौ. किमी पुनर्भरण क्षेत्र, तर २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे व यात ८२ टक्के भाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणीसाठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.
- पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने नैसर्गिक भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. जलयुक्तच्या कामांमुळे ब-यापैकी स्थिती आहे. पाच तालुक्यात शास्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणाचे नियोजन हवे.डॉ. पी.व्ही. कथनेउपसंचालक, जीएसडीए