नागरिक हैराण : शासकीय, खासगी दवाखाने हाऊसफुल्लनांदगाव खंडेश्वर : जसजसा सूर्य आग ओकतोय तसतशी जीवाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तापाचे आजार बळावले असून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. तापमानाचा वाढता पारा उष्माघाताला आमंत्रण देतोय. त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे. उन्हाच्या तीव्र झळा बालकांवर ‘फास्ट अटॅक’ करीत असल्याने लहान मुलांमध्ळे अतिसार, जुलाब, सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार वाढले आहेत. महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी याचे प्रमाण वाढले आहे. पुरूषांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे वयोवृद्ध नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. नागरिकांवर तापाच्या आजाराचा मोठा परिणाम होत असून स्थानिक ठिकाणी सरकारी तसेच खासगी दवाखान्यात परिपूर्ण सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णांना अमरावती येथे खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. तापमान ४३ अंश सेल्सीयसवर गेल्याने काही दिवसातच उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्याच सकाळी १० वाजतापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारच्या सत्रात नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. नांदगावातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दैनंदिन २०० रुग्णांची ओ. पी. डी. होत आहे. परंतू रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने एकमेव असलेल्या महिला डॉक्टरवर प्रचंड ताण येत आहे व रुग्णांवर सुद्धा पुरेसा उपचार होत नाही. त्यामुळे याठिकाणी निदान दोन डॉक्टरांची नियुक्ती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. तसेच खासगी दवाखानेसुद्धा रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. खासगी दवाखान्यात दैनंदिन शंभरच्या आसपास रुग्णांवर उपचार होत आहे. एकंदरीत उष्णतेची लाट कायम राहिल्यास रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)‘सन स्ट्रोक’मुळे स्त्री, पुरूष, लहान बालक, वयोवृद्ध नागरिकांना विविध आजारांनी वेढले असून महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, असे प्रकार वाढले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत महिलांनी निंबू शरबत, साखरपाणी जास्त प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. लहान बालक व पुरुषांनी उन्हापासून दक्ष राहणे गरजेचे आहे. - मंगेश पचगडे, संचालक, महालक्ष्मी हॉस्पिटल, नांदगाव खंडे.
‘सन स्ट्रोक’ने केला नांदगावात कहर!
By admin | Published: May 06, 2016 12:08 AM