अमरावती : सूर्यमालेत विलोभनीय दिसणाराकडे धारण करणारा शनी ग्रह ९ जुलै रोजी सूर्याच्या अगदी समोरासमोर येणार आहे. या दिवशी शनी, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतील. त्यामुळे या ग्रहाचा पृथ्वीवरून दिसणारा संपूर्ण भाग प्रकाशमान राहील. या दिवशी पृथ्वीपासूनचे शनी ग्रहाचे अंतर कमीत कमी अर्थात १ अब्ज ३५ कोटी १० लाख किमी राहणार असल्यामुळे त्याची तेजस्वीता जास्तीत जास्त राहील. यामुळे आकाश निरभ्र असल्यास त्याचे निरीक्षण व दुर्बिणीतून छायाचित्रे घेण्यासाठी उत्तम संधी राहील.शनी ग्रह सूर्यमालेत सहाव्या क्रमांकावर असून, तो संपूर्णत: वायूचा बनलेला आहे. या ग्रहाभोवती वैशिष्ट्यपूर्ण असे वलय आहे. या वलयात खडक, बर्फ, धूळ व वायू समाविष्ट आहेत. हा ग्रह सूर्यापासून सरासरी १ अब्ज ४२ कोटी ७० लक्ष किलोमीटर दूर आहे. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला या ग्रहाला २९.४६ वर्षे लागतात. वैज्ञानिकांनी या ग्रहाचे एकूण ६२ चंद्र शोधून काढले असून, त्यापैकी ५३ ग्रहांचे नामकरण करण्यात आले आहे. सर्वांत मोठा ग्रह टायटन चंद्र, विशिष्ट परिस्थितीत साधारण दुर्बिणीनेही दिसू शकतो.शनी ग्रहाचे ९ जुलैला सायंकाळी पश्चिमेकडे सूर्य मावळल्याबरोबर पूर्व क्षितिजावर ६.४२ वाजता आगमन होईल. सध्या तो सूर्याच्या विरुद्ध बाजूला असल्यामुळे रात्रभर त्याची उपस्थिती आकाशात राहील. आकाश निरभ्र असताना शनी ग्रहाचे अवलोकन करावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.
सूर्य-शनी प्रतियुती पुढील मंगळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 10:43 PM