अमरावती: यवतमाळ जिल्ह्याशी संलग्न असलेल्या धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथे सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा द्यावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांच्यासोबत चर्चेतून केली. मित्तल यांनी शुक्रवारी धामणगाव रेल्वे व टिमटाला रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी चांदूर रेल्वे येथील रेल रोको कृती समितीनेही तीन रेल्वे गाड्यांचा थांबा तसेच रेल्वे स्थानकाच्या सुसज्जतेची मागणी निवेदनातून केली.
महाव्यवस्थापक मित्तल यांनी धामणगाव रेल्वे स्थानकाचेही निरीक्षण केले. खासदार रामदास तडस यांनी त्यांची भेट घेऊन धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे स्थानकावर आझाद हिंद एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, प्रेरणा एक्स्प्रेस, बिकानेर-सिकंदराबाद एक्स्प्रेस तसेच चांदर रेल्वे येथे नागपूर-पुणे गरीब रथ, रेणुगुंठा- जयपूर एक्स्प्रेस तसेच वरूड येथे जयपूर-सिकंदराबाद व मोर्शी येथे इंदूर-यशवंतपूर एक्स्प्रेसचा थांबा देण्याची मागणी केली. नरखेड मार्गावर रिद्धपूर येथे थांबा देण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, विशेष ट्रेनने आलेले मित्तल यांनी टिमटाला स्थानकावर एका रूमचे उद्घाटन तसेच स्थानकाची पाहणी केली. यावेळी दीडशे अधिकारी कर्मचाºयांचा ताफा उपस्थित होता. चांदूर रेल्वे येथील रेल रोको कृती समितीने त्यांना गरीबरथसह नवजीवन एक्स्प्रेस व गोंडवाना एक्स्प्रेसच्या थांब्याची मागणी केली. याशिवाय चांदूर रेल्वे स्टेशन सुसज्ज करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, महमूद हुसेन, राजाभाऊ भैसे, विनोद जोशी, बंडू यादव, विजय रोडगे, गोपाल मुरायते, मदन कोठारी, राजू खांडपासोळे, रामदास कारमोरे, भीमराव खलाटे, संजय डगवार, विनोद लहाणे, महादेवराव शेंद्रे, पंकज गुडधे, बालू पठाण आदी शहरवासीयांची उपस्थिती होती.रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा
अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावरील कोळविहीर, आष्टगाव, मोर्शी, पाळा, हिवरखेड, बेनोडा, वरूड, पुसला तसेच नागपूर-बडनेरा दरम्यान शिंदी, तुळजापूर, शेलू रोड, वरूड, दहिगाव, कवठा, पुलगाव, तळणी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मालखेड, टीमटाला या स्थानकांवर प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने अनेक वेळा अपघात घडले आहेत. येथील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी केली. या मागण्यांवर पावले उचलली जाणार असल्याचे रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी सांगितले.