अमरावती : ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘ग्रीन रन स्पर्धेत’ तीन हजार ७३ स्पर्धेकांनी सहभाग घेऊन धावण्याची व सायकलिंग स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ७२ किलोमीटर सायकलिंग तर पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनीही ७२ किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत एकूण ७६८ स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, अमरावती जिल्ह्यातील तालुकास्तरावर दोन हजार पाच स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियममध्ये या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धेच्या बक्षीस व पदक वितरण समारंभात विभागीय आयुक्त पीयूष सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक रेड्डी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पीडीएमसीचे माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी, अधिष्ठाता अजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर इंजेवार, रतन इंडिया पावर लिमिटेडचे कर्नल लोकेश सिंग यांची उपस्थिती होती.
या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
बॉक्स
दर्यापुरात बुंदिले व आकांशा वगारे विजयी
दर्यापूर पोलीस ठाणे, नगर परिषद व तहसील विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीन रन स्पर्धेत एकूण २८१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ठाणेदार प्रमेश आत्राम, मुख्याधिकारी गीता वंझारी, एसडीपीओ मोरे व तहसीलदार योगेश देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत हनुमान व्यायाम क्रीडा मंडळाचा लखन बुंदेले प्रथम, द्वितीय अस्लम शहा, तृतीय लक्ष्मण बायवार तर महिलांमधून प्रथम आकांक्षा वगारे हिने धाव पूर्ण केली. यासोबतच द्वितीय साक्षी ढवळे व तृतीय साक्षी शंके यांनी बक्षिसे पटकावली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन आदर्श शाळेचे शारीरिक शिक्षक अनिल भारसाकळे, तर आभार प्रदर्शन नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल देशमुख यांनी केले.