अमरावती : येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जिल्हा कोविड रुग्णालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा आता जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आणि जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे मिळणार आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेने निर्णय घेतला असून, १२ जुलैपासून हे कंत्राटी कर्मचारी या दोन्ही रुग्णालयांमध्ये सेवा बजावणार आहेत.
कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या आरोग्य सेवेत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत कमी करायचे नाही, असा फतवा जारी केला आहे. त्यामुळे येथील सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात नियुक्त सुमारे २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. आजमितीला ४५० बेडची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात केवळ ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना फारशी कामे नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे इर्विन, डफरीन रुग्णालयात आरोग्यसेवेचा ताण बघता, आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना येथे सोमवारपासून सेवा बजवावी लागणार आहे.
--------------------
कोट
सुपर स्पेशालिटीच्या कोविड रुग्णालयात रुग्ण कमी झाले आहे. त्यामुळे येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना फारसे कामे नाहीत. परिणामी सोमवारपासून इर्विन, डफरीनमध्ये या कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागणार आहे. तसे निर्देश संबंधितांना दिले आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक.
------------------
२०० कर्मचाऱ्यांच्या सेवेचे नियोजन
कोविड रूग्णालयात २५० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. त्यापैकी २०० कर्मचाऱ्यांची सेवा डफरीन, इर्विनमध्ये देण्यााबबत नियोजन करण्यात आले आहे. यात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बाय, मॅनेजर, सफाई कर्मचारी आदींचा समावेश आहे. जी कामे कोविड रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावी लागत होते, तीच कामे डफरीन, इर्विनमध्ये करावी लागतील, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.