गणेश वासनिक
अमरावती : पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह पशुपक्ष्यांनाही लागली आहे. सूर्य मेपासून आग ओकत असल्यामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अशातच मृग नक्षत्र लांबणीवर पडल्याने विदर्भात व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. परिणामी, पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी सोडून वाघांसह इतर वन्यजीवांची तहान भागवावी लागत आहे.
मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा व बोर अभयारण्य या विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांसह पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्यात वाघांच्या तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. यंदा मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे जंगलात पाण्याची कमतरता जाणवली नाही. मात्र, मे महिन्यात तप्त उन्हामुळे पाणवठ्यातील पाणी आटले आहे. त्यामुळे वाघांसह अन्य वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत सारखीच परिस्थिती आहे. नैसर्गिक पाणवठे आटल्याने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.
वाघांचा शिकारीसाठी १५ ते २० किमीचा प्रवास
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, वन्यजीवांना उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. अशातच वाघांना शिकारीसाठी रोज सुमारे १५ ते २० किमीचा प्रवास करावा लागत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यातच बहुतांश नैसर्गिक पाणवठे देखील आटले आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या काही भागातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मेपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असून, पाऊस लांबल्यामुळे वन्यजीवांच्या तृष्णातृप्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी नैसर्गिक पाणवठेदेखील आटल्याचे वास्तव आहे.
- मनोजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, क्राइम सेल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प