अमरावती: केंद्र शासनाने पारित केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ ९ जानेवारी रोजी मोर्शी येथे लोकाधिकार मंचच्यावतीने लक्षवेधी रॅली काढण्यात आली. सिंबोरा मार्गातील छत्रपती शिवाजी चौकातून रॅलीला माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, गायत्री परिवार, सहजयोग परिवार, गणपती मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ, क्रीडा मंडळ, भजनी मंडळ, मठ, मंदिर तसेच विविध धार्मिक संघटनांच्या सदस्यांचा सहभाग होता. भारतमातेची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली स्थानिक जयस्तंभ चौक, मुख्य बाजारपेठ येथून मार्गक्रमण करीत गांधी चौक, गुजरी बाजार, सूर्योदय चौक मार्गे थेट पंजाबबाबा सभागृहात नेऊन रॅलीची सांगता झाली. उपविभागीय अधिकाºयांना लेखी निवेदन यावेळी देण्यात आले.
रॅलीत डॉ. वसुधा बोंडे, सागर खेडकर, सोपान कनेरकर, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष राजेश बुरंगे, प्रकाश बुद्धदेव, सुरेश हुकूम, नवीन पेठे, सुरेश बिजवे, राजेश घोडकी, विनोद चिखले, ज्योतिप्रसाद मालवीय, नगर परिषद उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, भाजपचे तालुकाप्रमुख अजय आगरकर, अशोक खवले, निखिल ओझा, जिल्हा परिषद सदस्य संजय धुलक्षे, प्रमोद हरणे, मनोहर अंगणानी, प्रतिभा राऊत, अश्विनी वानखडे, नीलिमा साहू, किशोर पंचगळे, निखिल कडू, लखन बहादूरकर, शिवा धुर्वे, नितीन राऊत, डॉ. श्यामसुंदर राठी, सागर पाटील तसेच भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.
तीनशे फुटांचा तिरंगा
रॅलीत तीनशे फूट लांबीचा तिरंगा झेंडा विशेष आकर्षण ठरला. या रॅलीत सहभागी नागरिकांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. व्यापाºयांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून कायद्याला पाठिंबा जाहीर केला.