मुख्याधिकारी कक्षात ठिय्या : पालिकेत अधिकारी अनुपस्थितचांदूरबाजार : चार दिवसांपासून स्थानिक नगरपरिषद सभागृहात दोन नगरसेवकांचे उपोषण तर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. त्यात आज गावातील नागरिकांनी उडी घेतली असून उपोषणकर्त्या नगरसेवकांच्या मागण्या रास्त असून त्याची त्वरित दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी घेऊन नागरिकांनी पालिकेवर धडक दिली. या मोर्चात ५०० ते ६०० नागरिक असून यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. एवढा सगळा प्रकार सुरु असताना पालिकेत नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठीही मुख्याधिकारी हजर झाले नाहीत. म्हणून निवेदन स्वीकारण्याला अधिकारी येईपर्यंत आम्ही पालिकेतून जाणार नाही, असा पवित्रा घेऊन ५० ते ६० नागरिकांनी मुख्याधिकारी कक्षात ठिय्या मांडला. निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. नळ मीटर व ३४ लाखांच्या रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले आहे. काही नगरसेवकांचा प्रशासकीय कामात होणारा हस्तक्षेप वाढल्यामुळे पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. याचा परिणाम गावातील स्वच्छतेवर झाला आहे. स्वच्छतेची कामे करण्याच्या मागणीसाठी प्रभाग १ व २ मधील ४०० ते ५०० नागरिक महिलांसह दुपारी १२ वाजता नेताजी चौक मार्गे पालिकेवर धडकले. त्यांनी दिलेल्या निवेदनात उपोषणकर्त्या नगरसेवकांच्या मागण्या अंत्यत महत्त्वाच्या असून जनहितार्थ आहेत. कर्तव्यदक्ष नगरसेवकावर अशा प्रकारे आंदोलन करण्याची पाळी येणे व त्याची वरिष्ठांकडून अद्यापही दखल न घेणे ही गंभीर कारवाई करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. अन्यथा विपरीत घडण्याची शक्यताही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. निवेदनावर महिलांसह १४६ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोर्चा पालिकेवर धडकताच त्याठिकाणी उपोषणकर्ते गोपाल तिरमारे माजी नगरसेवक विजय सरवटकर, घनशाम पालीवाल यांनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढून येथील बहुतेक कर्मचारी व अधिकारी ‘अपडाऊन’ करुन नागरिकांना वेठीस धरतात, असा आरोप केला. यावेळी ठाणेदार दिलदार तडवी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची अद्याप दखल घेण्यात आली नाही. तीच गत आजच्या मोर्चातील नागरिकांची झाल्यामुळे नागरिकांना मुख्याधिकारी कक्षात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. (तालुका प्रतिनिधी)पालिका प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये रोषस्थानिक नगर पालीकेत कामचूकार अधिकाऱ्यांमुळे नागरिकांची महत्वाची कामे होण्यात दिरंगाई होत आहे. परिणामी विकासकामांनाही खिळ बसली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी अधिकारी कार्यालयात गैरहजर राहात असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी नगर पालीका कार्यालयावर मोर्चा नेला.
नगरसेवकांच्या समर्थनार्थ पालिकेवर धडकले नागरिक
By admin | Published: April 05, 2015 12:31 AM