अमरावती : सध्या देशात वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत आहे, यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, अशा प्रकारचे विनाकारण वाद सर्वोच्च न्यायालयाने उकरून काढू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ॲड. आंबेडकर हे आज (दि. २१) अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही ताशेरे ओढले.
हल्ली जाती, धर्मात तेढ निर्माण होईल, असे नेत्यांचे व्यक्तव्य आहेत. कधी मंदिर, मशीद, तर कधी हनुमान चालिसा असे अनावश्यक मुद्दे आणले जात आहेत. ज्ञानवापी मशीदचा मुद्दा देशभरात वादग्रस्त ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मग काय, सम्राट अशोकाच्या काळात बांधलेले बौद्ध विहार कुठे गेले? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. वाद उकरून काढणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. देशात शांतता पाहिजे की अशांतता हे लोकांनी ठरवलं पाहिजे असेही ते म्हणाले.
शरद पवारांनी ब्राम्हण विरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी बैठक बोलावली
अभिनेत्री केतकी चितळे प्रकरण आता वेगळ्या वळणार गेले आहे, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी ब्राम्हण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले आणि केतकी हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मी ब्राम्हण विरोधी नाही, हे सिध्द करण्यासाठी बैठक बोलावली, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शरद पवार यांच्यावर ब्राम्हण समाजाने बहिष्कार घातल्याने या बैठकीत ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे काही जणांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला याचे उत्तर शरद पवार देतील, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
दम असेल तर मला उचलून दाखवावं
देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहे. भाजपने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. त्यामुळे दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी,असे थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिले. मात्र यावेळी भाजपवर टीका करताना त्यांची जीभ घरसली होती, हे विशेष.