कामाचा वाढला ताण, शासनाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष
धामणगाव रेल्वे : प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालावा, अनेक योजना राबविण्यात याव्या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर पंचायत विस्तार अधिकारी यांची दोन पदे आहेत. या अधिकाऱ्यांना आता इतर विभागांचा अधिभार दिल्याने त्यांच्याकडील कामाचा ताण वाढला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये दोन पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची पदे आहेत. या विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा प्रत्येक महिन्याला घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना राबविल्या जातात का, ग्रामसेवक व्यवस्थितपणे कामकाज पाहतात काय तसेच आगामी काळात कोणत्या योजना अमलात आणाव्यात, त्याचे नियोजन किती प्रमाणात होते, यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी दोन पंचायत विस्तार अधिकारी पदे आहेत. मात्र, मागील दोन वर्षांपासून या पंचायत विस्तार अधिकारी यांना कृषी, बांधकाम आरोग्य, शिक्षण, भारत मिशन एमआरजीएस, जल जीवन मिशन या कामाचे पाहणी व नियंत्रणाचा अधिभार देण्यात आला आहे. त्यामुळे हे पंचायत विस्तार अधिकारी कामामुळे अधिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या दर महिन्याला होणाऱ्या समन्वय समितीच्या सभेला गटविकास अधिकाऱ्यांना जाणे महत्त्वाचे असताना या सभेला विस्तार अधिकाऱ्यांना पाठविण्याचे प्रकार वाढले आहे.
‘त्या’ आदेशाला केराची टोपली
पंचायत विस्तार अधिकारी हे स्वतंत्र पद असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा पंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी घ्यावा. याव्यतिरिक्त दुसऱ्या कामाचा अधिभार देऊ नये, असे आदेश २६ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी काढले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
पंचायत विस्तार अधिकाऱ्यांना कर्तव्यसूचीबाहेरील कामे सांगितली जातात. त्यामुळे कामाचा ताण अधिक वाढला आहे. ही कामे कमी करण्यात यावी.
- महादेव कासदेकर, अध्यक्ष, विस्तार अधिकारी संघटना