मनीष तसरे
अमरावती : शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजापेठ ते इर्विन उड्डाणपूलाचा राजकमल ते जयस्तंभ चौकादरम्यानचा पृष्ठभाग चार ठिकाणी दुभंगल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान लक्षात आली. तातडीने पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली.
श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी रात्री निघालेली भव्य शोभायात्रा उपरोक्त उड्डाणपुलाच्या खालूनच होता. पुढे उड्डाणपुलाच्या खाली राजकमल चौकातच रात्री साडेदहा वाजता शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होती. वाहतूक पोलिस तेथे तैनात होता. त्यालाच उड्डाणपुलाचे एकमेकाला जोडलेले दोन पृष्ठभाग काही प्रमाणात दुभंगल्याचे एका ठिकाणी लक्षात आले. पुढे जयस्तंभ चौकापर्यंत पाहणी केल्यावर अन्य तीन ठिकाणीही अशाच प्रकार त्यांना दिसला. त्यांनी लगेच चौकात असलेल्या पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली.