प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : बाजारभावाची शहानिशा न करता दुप्पट दराने खरेदी केलेल्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहना’मुळे महापालिकेचे अग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्चून खरेदी केलेल्या या वाहनासाठी विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. राष्टय बाजारपेठेत ७० लाख ते १ कोटीत उपलब्ध होणाऱ्या वाहनासाठी २ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्याची बाब कुणाच्याही पचनी पडली नसून, एवढ्या किमतीत हेलिकॉप्टर घेतले काय, अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमटली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या अनियमिततेबाबत तक्रार करण्यात आली असून महापालिकेची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करावी तसेच निधी एंटरप्रायजेस या कंपनीला दिलेली वर्क आॅर्डर रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
असे आहेत आक्षेपवाहनासाठी अग्निशमन विभागाने ‘ईओआय’ (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागितले नाहीत. प्री-बीड मीटिंग बोलावण्यात आली नाही. वाहनाची किंमत माहीत करण्यासाठी स्थानिक वा राष्टय वृत्तपत्रात जाहिरात देऊन पुरवठादार किंवा कंपनीकडून कोटेशन मागविण्यात आले नाही. टेंडर नोटीसमध्ये वाहनाची किंमत देण्यात आली नाही. चेसीस खरेदीकरिता कोटेशन वा निविदा बोलाविण्यात आली नाही. स्वत: पुरवठादार हा मॅन्यूफॅक्चरर नसताना केवळ ‘अथॉरायझेशन सर्टिफिकेट’च्या आधारे पुरवठा आदेश देण्यात आले.
उपायुक्तांसह अग्निशमन अधिकाऱ्यांवर आरोपउपायुक्त नरेंद्र वानखडेंसह अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चव्हाण संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या सोळा पानी तक्रारीत तथाकथित कन्सल्टंट संदीप देशमुखही आहेत. निविदाप्रक्रिया मॅनेज केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत कुठलीही अनियमितता झालेली नाही. तक्रारकर्त्याला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांनी तक्रार केलेली असून, याबाबत मला भाष्य करता येणार नाही.- भारतसिंह चव्हाण, अधीक्षक, अग्निशमन विभाग महापालिका