जिल्हा परिषद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अमरावती : काेरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर आता डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. अशातच ग्रामीण भागात अचलपूर, तिवसा, चिखलदरा या तालुक्यांतील काही गावे डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यामुळे या गावांत ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण करण्याचे आदेश साेमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामीण भागात गत काही महिन्यांपासून डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. गत जून महिन्यात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते. आता मात्र जुलै महिन्यात या रुग्णांचा आकडा १९ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी तसेच मेळघाट, अचलपूर, तिवसा येथील तालुका आरोग्य अधिकारी यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत डेंग्यू रुग्ण वाढण्यामागील कारणे, करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदींचा आढावा टीएमओकडून घेण्यात आला. यावेळी ज्या ठिकाणी या रुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या, अशा गावात आरोग्य सेविकांकडून सर्वेक्षण करणे, पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी स्वच्छता राखणे तसेच फॉगिंग करणे आवश्यक असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यानुसार सीईओंनी रुग्ण आढळलेल्या गावात त्वरित सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. याशिवाय आरोग्य कर्मचारी यांनी दर पंधरवड्यात गावोगावी दौरे केले आहेत. याची माहिती सादर करण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे २५ आणि ४ मलेरियाचे रुग्ण आढल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जोगी यांनी दिली. यात वरील तिन्ही तालुक्यात रुग्ण अधिक असल्याने या गावावर आरोग्य विभागाचा ‘वाॅच’ आहे. या तीन तालुक्यांतील सर्वेक्षणानंतर अन्य तालुक्यांमध्ये मोहीम राबविली जाणार असल्याचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, बी.एस. वावरे, टीएमओ डाॅ. सतीश प्रधान, किरण शिंदे, ज्योत्स्ना पोटपिटे आदी उपस्थित होते.