फोटो २७एएमपीएच१८ कॅप्शन - आरोपी विनोद शिवकुमारला पायी न्यायालयात नेताना पोलीस.
२७एएमपीएच१९ - आरोपीचे छायाचित्र पायदळी तुडविताना संतप्त महिला.
२७एएमपीएच१८ -
धारणी न्यायालयासमोर हजर, वनकर्मचारी, महिलांची संतप्त निदर्शने, आरोपीचे छायाचित्र जाळले
धारणी (अमरावती) : तालुक्यातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित डीएफओ विनोद शिवकुमार याला स्थानिक न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. २६ मार्च रोजी विनोद शिवकुमार याला पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अटक केली होती. शुक्रवारी सायंकाळी त्याला धारणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी धारणी येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विनोद शिवकुमार याच्या प्रशासकीय व मानसिक त्रासाला कंटाळून आरएफओ दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तोंडातून ‘ब्र‘ देखील काढला नाही. दरम्यान २७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता त्याला पोलीस बंदोबस्तात धारणी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात आणण्यात आले. प्रथम न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्यासमोर चोख बंदोबस्तात हजर करण्यात आले. तेथे पोलिसांच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकरी संजय काळे, तर आरोपीच्यावतीने सुशील मिश्रा यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायाधीश एम. एस. गाडे यांनी आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयीन निर्णयानंतरदेखील त्याला कडक पोलीस बंदोबस्तात धारणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आरोपीला न्यायालयात पायदळ न्या
आरोपी विनोद शिवकुमार याने दीपाली चव्हाण यांना गर्भावस्थेत जंगलात पायदळ फिरविले. त्याचप्रमाणे शिवकुमारलादेखील वाहनातून न नेता पायदळच न्यायालयात न्या, अशी आग्रही मागणी वनविभागातील महिला कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणेदार विलास कुळकर्णी यांचेकडे धरला. मात्र, जनसंताप पाहता विनोद शिवकुमारला पोलीस व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आले.
शिवकुमारला फाशीच द्या
आरोपी शिवकुमारमुळे दीपाली चव्हाण यांचा गर्भपात झाला. त्या आत्महत्येवेळी देखील गर्भवती होत्या. त्यामुळे ते एक नव्हे तर तीन जीव जाण्यास जबाबदार आहेत, त्यामुळे शिवकुमारला फाशीच द्यावी, अशी मागणी सुसर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर व अन्य वनकर्मचारी व अन्य महिलांनी केली. आरोपी शिवकुमार मुर्दाबाद, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत शिवकुमारचे छायाचित्र जाळण्यात आले.
न्यायालयाबाहेर लोकभावना संतप्त
आरोपी विनोद शिवकुमारला धारणी न्यायालयात आणण्यात येत असल्याची खबर मिळताच अनेक महिला वनकर्मचारी, अधिकारी व धारणीकरांनी न्यायालयाबाहेर एकच गर्दी केली. शिवकुमारबद्दलचा संताप लोकांना अनावर झाल्याने कित्येक वेळ शिवकुमार मुर्दाबादचे नारे गुंजले. लोकसमुदाय आवरण्यासाठी धारणी पोलिसांना महत्कष्ट करावे लागले.
------------