ंअमरावती : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्हा परिषदेत कर्मचार्यांच्या बदल्यांची लगीनघाई सुरू झाली होती. अशातच विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे २0 ते २१ मे दरम्यान झालेल्या जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचे आदेश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. जिल्हा परिषदेत दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषदेतील गट क आणि गट ड मधील कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जातात. यावर्षी लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक बदलविण्यात आले होते. बदली धोरणाबाबत शासनाचे निकष ठरल्यानंतर त्यानुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागात बदलीपात्र ठरलेल्या कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १८ मे पासून जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सुरु करण्यात आली होती. यापैकी १८ आणि १९ मे रोजी करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, सिंचन या विभागातील कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच २0 मे रोजी विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे सुरुवातीला बदली प्रक्रिया राबवायची की नाही, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाला मार्गदर्शन मागितले होते. शासनाने प्रक्रिया करण्यास सहमती दिल्यानंतर ही प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्ण केली. बदली धोरणाबाबत शासनाने १५ मे, १९ मे आणि २१ मे रोजी विविध सूचना व खुलासे जिल्हा परिषदेला पाठविले आहेत. त्यानुसार ही बदली प्रक्रिया राबविली गेली. ही बदली प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर पूर्ण झाली असताना २२ मे रोजी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पाठविलेल्या पत्रानुसार सध्या राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत शासन धोरणानुसार कर्मचार्यांच्या बदल्या करणे शक्य आहे किंवा कसे या संदर्भात आचारसंहितेशी निगडीत जिल्हा परिषदांकडून विचारणा होत आहे. दरम्यान यासंदर्भात शासन स्तरावर ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून आचारसंहितेतील कालावधीत बदल्यांच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत शासन स्तरावरुन या ठिकाणी आचारसंहिता लागू असलेल्या जिल्हय़ात जिल्हा परिषदेंतर्गत गट क आणि गट ड मधील जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांना पुढील आदेशापर्यंंत स्थगित ठेवण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य, बांधकाम, पंचायत व सामान्य प्रशासन विभागातील सुमारे २0६ कर्मचार्यांच्या बदल्या आचारसंहितेच्या आडकाठीत आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्यांना स्थगिती
By admin | Published: May 27, 2014 11:22 PM