लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुढील वर्षी होऊ घातलेल्या अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा लीक झाल्याप्रकरणी दोन सहायक अभियंत्यांचे निलंबन, तर सेवानिवृ्त आरेखकावर सेवासमाप्तीचे गंडांतर आहे. आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुधीर गोटे, सहायक संचालक नगर रचना विभागातील सहायक अभियंता हेमंत महाजन आणि सेवानिवृत आरेखक प्रभाकर देवपुजारी यांच्यावर आराखडा लीकप्रकरणी समितीने ठपका ठेवल्याची माहिती आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशाद्वारे चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.महापालिकेतील प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा लीक झाल्याचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएसी मदान यांच्याकडे तक्रारींचा खच वाढला आहे. महापौर चेतन गावंडे, नगरसेवक धीरज हिवसे व अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्त तथा राज्य शासनाकडे प्रभाग रचनेचा प्रारूप रद्द करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांची उद्या पेशीप्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा लीक झाल्याप्रकरणी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांची सोमवार ६ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगासमोर पेशी होणार आहे. याप्रकरणी आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांची राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वळणावर पाेहोचले असून, राज्य निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत.
‘त्या’ अहवालानंतर निलंबनाचा निर्णयप्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा लीक झाल्याप्रकरणी आयुक्त प्रशांत रोडे यांनी लेखाधिकारी हेमंत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीत ठाकरे यांच्यासह विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण यांचा समावेश आहे. समितीला दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार शनिवारी समिती आयुक्त रोडे यांच्याकडे अहवाल सादर करेल, असा अंदाज होता. मात्र, हा अहवाल रविवारी वा सोमवारी सादर केला जाईल, असे संकेत आहेत. सहायक अभियंता सुधीर गोटे व हेमंत महाजन यांच्यावर अहवालात कारवाईचा ठपका ठेवण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. आयुक्त प्रशांत रोडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणती ॲक्शन घेतात, यानंतर कारवाईचा रोख स्पष्ट होईल.
दहा जणांचे बयाण चौकशी समितीने गत दोन दिवसांमध्ये १० जणांचे बयान नोंदविले. चौकशी अहवाल सादर केला नसला तरी तिघांवर ठपका आहे. रविवारी वा सोमवारी अहवाल सादर होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
चौकशी अहवाल प्राप्त झाला नाही. दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल. प्रारूप आराखड्यातील प्राथमिक अंदाजानुसार तिघे दोषी असल्याचे निदर्शनास येत आहे.- प्रशांत रोडे आयुक्त, महापालिका
दोन सहायक अभियंत्यांना पुढे करून कारवाई वाचविण्याचा प्रयत्न अक्षम्य आहे. खरे तर प्रारूप आराखडा लीक करण्यामागे आयुक्त प्रशांत रोडे यांचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे आयुक्तांचे निलंबन करून फौजदारी कारवाई व्हावी.- रवि राणा, आमदार
गोपनीयतेचा भंग झाला आहे. काही लोकांच्या सोयीसाठी पैसे घेऊन अभियंत्यांनी प्रभाग रचना केली. त्यामुळे या कार्यवाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ही प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.- सुलभा खोडके, आमदार