अमरावती : येथील रामपुरी कॅम्पस्थित विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या वसतिगृहात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यानंतर ही घटना उघड झाली. आदर्श नीतेश कोगे (वय १२, रा. जामलीवन, ता. चिखलदरा) असे मृताचे नाव आहे. माझ्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून, तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप वडील नीतेश कोगे यांनी केला आहे. दरम्यान, आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला जाणार आहे.
विद्याभारती शिक्षण संस्थेकडून स्थानिक रामपुरी कॅम्प भागात विद्याभारती माध्यमिक विद्यालय व त्याच आवारात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह चालविले जाते. आदर्श हा विद्याभारती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. तो वसतिगृहात अन्य विद्यार्थ्यांसमवेत राहत होता. आदर्शला आवाज दिल्यानंतरही तो न उठल्याने चौकीदाराने त्याला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने गृहपाल रवी तिघाडे यांना माहिती देण्यात आली.
मारहाणीचा आरोप
मला मारले, असा संदेश आदर्शने २० जुुलै रोजी दुपारी व्हॉट्सॲपवर पाठविला. त्याच्या पाठीवर मारहाणीच्या खुणादेखील दिसत आहेत. अन्य विद्यार्थ्यांशी त्याचा वाद झाला होता तर त्याला गृहपालाने वेगळ्या खोलीत ठेवायला हवे होते. तसे न झाल्याने त्यांच्यात पुन्हा वाद होऊन मारहाण झाली असावी, त्यात आपल्या मुलाचा मृत्यू झाला असावा, असा संशयवजा आक्षेप आदर्शच्या वडिलांनी पोलिसांकडे व्यक्त केला. डीसीपी एम. एम. मकानदार व सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी पारदर्शक तपासाची ग्वाही देऊन कुटुंबीयांना शांत केले.
रुग्णालयात केले मृत घोषित
आदर्श सकाळी झोपेतून उठलाच नाही. त्यानंतर व्यवस्थापन व विद्यालयाच्या मुख्याध्यापकालादेखील कळविण्यात आले. त्याला तातडीने डॉ. हेमंत मुरके यांच्या बालरुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आदर्शला मृत घोषित केले. याबाबत इर्विनकडून गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार आसाराम चोरमले इर्विनमध्ये पोहोचले, तर दुपारी १२ च्या सुमारास आदर्शचे आई-वडील व बरेचसे ग्रामस्थदेखील इर्विनमध्ये पोहोचले.