लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे दिले.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) व ग्रामविकास विभागातर्फे नियोजन भवनात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी झा, व्यवस्थापक युवराज सासवडे, खोजचे महादेव गील्लुरकर, राहुल दभाने आदी उपस्थित होते. पालकमंत्री ना. बोंडे म्हणाले, ग्राम परिवर्तकाने गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. विविध विभागांच्या समन्वयातून विविध योजनांचा मेळ घालून विकास घडविणे, हे अभियानात अपेक्षित आहे. त्यानुसार ग्राम परिवर्तकाने काम करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे उत्तम अभियान आकारास आले आहे. ग्राम परिवर्तकांनी स्थानिक जनजीवनाशी समरस होणे आवश्यक आहे. अभियानातील बदल टिपले पाहिजेत. चांगली कामे झाली आहेत. इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी यशोगाथेचे सादरीकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून तशा योजना बनवाव्यात. गावातील उच्च विद्याविभूषित किंवा मोठ्या पदावर गेलेल्या नागरिकांना ग्रामविकासात सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करावे.अभियानात ३४ गावांत विकासकामे होत आहेत. यात सुरू झालेल्या ५५० बचत गटांपैकी अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यात मेळघाटात प्राधान्याने कामे राबवण्यात आली. कुपोषणावर मात करण्यासाठी न्यूट्रीशन इंडिया कार्यक्रम १०५ गावांत राबविण्यात येत आहे. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शिक्षण व आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी कोरकू भाषेत जागृतीपर साहित्य वितरित करण्यात येत आहे, असे मनीषा खत्री यांनी प्रास्ताविकात सांगितले. गावात अनेक विधायक बदल घडून येत असल्याचे रानामालूर गावाच्या सरपंच चंदा जावरकर यांनी सांगितले. टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी झा यांनीही मनोगत व्यक्त केले. विविध गावांच्या सरपंचांनी यावेळी अभियानाबाबत अनुभव कथन केले. वैष्णवी कायाळकर, मंगेश खराटे यांच्यासह ग्राम परिवर्तकांनी गावात राबविलेल्या कामांची माहिती दिली. अभियानाच्या यशोगाथेचे प्रकाशन यावेळी झाले. याप्रसंगी विविध गावांचे सरपंच, ग्राम परिवर्तक व अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावांचा शाश्वत विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:28 AM
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे दिले.
ठळक मुद्देअनिल बोंडे : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान