फोटो - नांदगावपेठ १२ पी
नांदगाव पेठ : नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या भरधाव एसयूव्हीचे संतुलन बिघडल्याने ते वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना महामार्गावरील सावर्डी गावाजवळ पहाटे ६ च्या सुमारास घडली. सुनील मधुकर जावडे (रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर स्विफ्ट डिझायर वाहनाने पेट घेतल्याने काही वेळ महामार्गावर वाहनांची कोंडी निर्माण झाली होती.
गुरुवारी सकाळी अमरावती येथून सुनील जावडे हे एमएच २७ बीव्ही ५८५७ क्रमांकाच्या वाहनाने तिवस्याकडे जात असताना सावर्डी गावानजीक नागपूर येथून भरधाव येणाऱ्या एमएच २७ बीएच ५५१३ क्रमांकाच्या एसयूव्हीचे संतुलन बिघडल्याने ते वाहन कारवर आदळले. या अपघातात सुनील जावडे जागीच ठार झाले, तर अन्य चालक सतीश खैरे हा जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर स्विफ्ट डिझायरने पेट घेतला होता. काही वेळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. नांदगाव पेठचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. नांदगावपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.