लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हँडल लॉक तोडून व बनावट चाबीने दुचाकी चोरणे आणि स्पेअर पार्ट अदलाबदली करून वेगवेगळ्या वाहनांना लावण्याचा प्रताप करणाऱ्या तीन अल्पवयीनांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या १४ दुचाकी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केल्या आहेत.अमरावती येथून चोरलेल्या दुचाकी परतवाडा, धामणगाव गढी, तेलखार आदी परिसरात या या अल्पवयीनांनी विकल्या असून, तेथून पोलिसांनी त्या दुचाकी जप्त केल्या आहेत. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव व प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, पोलीस हवालदार विकास रायबोले, जावेद अहेमद, दिनेश नांदे, मोहम्मद सुलतान, निवृत्ती काकडे यांच्या पथकाने दुचाकीचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला.दरम्यान, २८ जून रोजी रामपुरी कॅम्प परिसरात दोन अल्पवयीन संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी अमरावती शहरातील विविध ठिकाणांवरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. हे तिन्ही अल्पवयीन दुचाकी चोरण्यासाठी बनावट चावीचा वापर करीत होते. काही वेळा हँडल लॉक तोडूनही त्यांनी दुचाकीचोरी केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.दुचाकी चोरल्यानंतर त्याचे स्पेअर पार्ट अदलाबदली करून, ते वेगवेगळ्या दुचाकींना लावीत होते. या तिन्ही अल्पवयीनांनाकडून पोलिसांनी तब्बल चार लाखांच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शहर पोलिसांनी तपासकार्याला आरंभ केला आहे.
दुचाकी चोरून स्पेअर पार्टची अदलाबदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:57 PM