लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अॅक्शन प्लॅन तयार केला. प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शुक्रवारी बैठकीत धूलिकणांचा नायनाट करण्यासाठी स्वीपिंग मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला.शहरातील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासंदर्भात शुक्रवारी महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या कक्षालगतच्या सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त हेमंत पवार, उपमहापौर संध्या टिकले, सभागृह नेता सुनील काळे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, उपआयुक्त महेश देशमुख, शहर अभियंता जीवन सदार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, अर्जुन ठोसरे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता व्ही.के. खातदेव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स्वप्निल लिंगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद पाटणकर, मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र डकरे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहराचा सन २०१६-१७ मधील पर्यावरण स्थितीच्या अहवालात हवेची गुणवत्ता दुय्यम, आरएसपीएम (धुलीकण) प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक व ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी २०१७ मध्ये अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यासंबधाने उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध विभागांना कळविण्यात आले होते. मात्र, पर्यावरणातील प्रदूषणाबाबत फारशी दखल विविध विभागांनी घेतली नाही.दरम्यानच्या काळ्यात धूलिकणांचा प्रकोप वाढला आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याचा गंभीर मुद्दा ‘लोकमत’ने वृत्त मालीकेतून लोकदरबारी मांडला. वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनेसंदर्भात पाऊले उचलली. यामध्ये सर्वप्रथम राजापेठ रस्त्यावरील धूलिकणांचा मुद्दा गंभीरतेने घेण्यात आला. रस्त्यावरील खड्डे गिट्टीने बुजविण्यात आले, तर आता पुढेच्या उपाययोजनेत डांबरीकरण करण्याचे प्रावधानसुद्धा केले आहे.शहरातील अन्य परिसरातील धूलिकणांचा नायनाट करण्यासाठी स्वीपिंग मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अमरावती शहरातील प्रदूषणाचा स्तर नक्कीच खाली येईल आणि अमरावतीकरांना शुद्ध हवा मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
धूलिकणांवर स्वीपिंग मशीनचा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 11:10 PM
शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अॅक्शन प्लॅन तयार केला.
ठळक मुद्देअॅक्शन प्लॅन तयार : प्रदूषणावर उपाययोजनांसाठी महापालिकेत बैठक